औरंगाबाद जिल्हा काँग्रेसच्यावतीने मराठा, मुस्लिम, धनगर, कोळी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी २ ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू केले होते. मात्र शासनाने उपोषणाची कोणतीच दखल न घेतल्यामुळे आता काँग्रेसच्या वतीने तीव्र पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत शासनाच्य वतीने लेखी आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय काँग्रेसपक्षाचे जिल्हाध्यक्ष व आमदार अब्दुल सत्तार यांनी पत्रकारांना बोलतांना महिती दिली.

अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात जिल्हा काँग्रेसच्यावतीने मराठा, मुस्लिम, धनगर, कोळी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मोठ्या स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २ ऑगस्ट पासून चक्री उपोषण सुरुकरण्यात आले होते. जोपर्यंत या सर्व समाजाला राज्य सरकार आरक्षण देणार नाही, तोपर्यंत काँग्रेस पक्षाच्या वतीने चक्री उपोषण सुरू राहील असा पण अब्दुल सत्तार यांनी केला होता. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर कार्यकर्ते ठाण मांडून होते.

दरम्यानच्या काळात पालाकमंत्री दिपक सावंत यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन आम्ही आरक्षणाच्या मागणीसाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले आणि तोंडी स्वरूपात उपोषण मागे घेण्याचा आग्रह केला होता. या व्यतीरिक्त शासनाने काँग्रेसपक्षाच्या चक्री उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे चक्री उपोषण रद्द करून बुधवार दि.२९ रोजी पासून अमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष व आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.