News Flash

सामाजिक दायित्वासाठी समन्वय

अनेक संस्थांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांत विकासकामांमध्ये तसेच जनजागृतीबाबत भरीव योगदान दिले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

सेवाभावी संस्थांमध्ये सुसंवाद घडविण्यासाठी जिल्हा परिषदेचा प्रयत्न

पालघर : पालघर जिल्ह्यात २० पेक्षा अधिक सामाजिक संस्था तसेच नामांकित उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत सेवाभावी काम करीत आहेत. या सर्व संस्थांच्या कामांमध्ये त्रुटी जाणवू लागल्या आहेत. कामामध्ये सुसंवाद, नियोजनबद्धता असल्यास  दुर्गम भागातील नागरिकांच्या गरजेप्रमाणे आवश्यक मदत पोहोचविण्याचे सोयीचे ठरेल. यासाठी संस्थांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न पालघर जिल्हा परिषदेने सुरू केला आहे.

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात व विशेषत: जव्हार, मोखाडा, तलासरी, डहाणू व विक्रमगड तालुक्यांमध्ये २० पेक्षा अधिक सामाजिक संस्था जिल्हा परिषदअंतर्गत येणाऱ्या महिला बाल विकास, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, मनरेगा अशा तेरा विभागांमध्ये सद्य:स्थितीत उद्योगांचा सामाजिक दायित्व निधी सामाजिक मदतीचे काम करीत आहेत. या अनेक संस्था त्यांच्या परीने मदत करण्याचे क्षेत्र व व्याप्ती निवडून त्या त्या क्षेत्रामध्ये काम करीत आहेत. अनेक संस्थांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांत विकासकामांमध्ये तसेच जनजागृतीबाबत भरीव योगदान दिले आहे.

असे असले तरी अशा संस्थांमध्ये परस्परांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे तसेच आवश्यक माहिती मिळत नसल्याने नेमकी गरज असलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यास येणारी मर्यादा, संबंधित विभागांशी समन्वय, एका भागात वेगवेगळ्या संस्थांकडून केले जाणारे एकाच प्रकारचे काम, कामात दुबारपणा (डुप्लिकेशन) तसेच प्रत्यक्षात काम करण्याची पद्धती यामध्ये तफावत येत असल्याचे दिसून आले आहे. पूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक दायित्व विभाग कार्यरत होता, मात्र कालांतराने जिल्ह्यात होणाऱ्या सामाजिक योगदानाबद्दल समन्वय साधण्याची जबाबदारी दुर्लक्षित राहिल्याने हे कार्य सामाजिक संस्था आपापल्या परीने करीत आहेत.

पालघर जिल्ह्यात आदिवासी व दुर्गम भागात सामाजिक उत्तरदायित्वअंतर्गत  मदत करण्यासाठी धोरण व रणनीती आखणे तसेच या कामी समन्वयासाठी अधिकारी नेमून जिल्हा परिषदेने अलीकडेच योजना बनवली आहे. महिला बाल कल्याण विभागाचे जिल्हा प्रकल्प अधिकारी प्रवीण भावसार यांची समन्वयकपदी नेमणूक करून  csrzppalghar@gmail.com   या ई-मेल आयडीवर सामाजिक संस्थांमार्फत सुरू असलेल्या कामाची माहिती पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते.

सामाजिक कार्याचे आज सादरीकरण

जिल्ह्यात सुरू असलेल्या सामाजिक कामांबाबत विविध सामाजिक संस्था व उद्योगातील सामाजिक दायित्व विभागाचे अधिकारी २८ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व अधिकारी यांच्या समोर आपल्या कार्यासंदर्भात माहितीचे सादरीकरण करणार आहेत. यामुळे आगामी काळात सामाजिक संस्थांकडे मदत करण्याची क्षमता व योजना यांची जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेली आवश्यकता यांच्याशी सांगड घालून आवश्यक ठिकाणी गरजेप्रमाणे मदत करण्यासाठी योजनेला चालना मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 2:26 am

Web Title: coordination for social responsibility csr zilla parishad effort akp 94
Next Stories
1 तक्रारींमुळे बेकायदा बांधकामांवर कारवाई
2 अवैध रेती उत्खननावर कारवाई
3 ‘आम्हाला महापालिका हवी’
Just Now!
X