टाळेबंदीच्या तिसरा सत्रांमध्ये जिल्ह्याबाहेर जाऊ पाहणाऱ्या व्यक्तीकरिता मुभा देण्यात आली असल्याने आपली वैद्यकीय तपासणी करून घेण्यासाठी परप्रांतीय नागरिकांची पालघरच्या आरोग्य केंद्राबाहेर सकाळपासून गर्दी झाली आहे. सकाळपासून या कामी 100 हून अधिक प्रमाणपत्र देण्यात आली असून सध्या लागलेला रांगेत 150 हून अधिक नागरिक उन्हामध्ये उभे असल्याचे चित्र आहे. तसेच, यावेळी सोशल डिस्टंसिंगच्या नियमाकडे साफ दुर्लक्ष केल्या गेल्याचं दिसून आलं.

पालघर जिल्ह्याबाहेर जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाने एक ऑनलाइन फॉर्म भरण्याची लिंक प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये आपली माहिती भरण्यास सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत. या ऑनलाईन अ‍ॅप मध्ये काही त्रुटी असल्याचे तसेच मदतीसाठी दिलेल्या संपर्क क्रमांकांवरून प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. दरम्यान या ॲपवर माहिती भरल्याशिवाय इतर जिल्ह्यांमध्ये पाठवने शक्य नसून पालघर हा सध्या रेड झोनमध्ये असल्याचे विविध संकेतस्थळावरून दिसून येत आहे.

दरम्यान रेल्वेने विशेष गाडी सोडल्यास किंवा बसची व्यवस्था झाल्यास अशा व्यक्तीना जिल्हा बाहेर जाताना त्यांच्याकडे आरोग्याचे प्रमाणपत्र मिळवावे या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एक नमुना तयार करण्यात आला होता. या नमुना आधारे काल काही प्रमाणपत्र देण्यात आल्यानंतर आज अशाच प्रकारची प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सकाळपासून आरोग्य केंद्राबाहेर गर्दी जमू लागली.

दरम्यान पालघर येथील आरोग्य केंद्राबाहेर तपासणीनंतर करोना लक्षणे नसल्याचे आढळल्यास तसे प्रमाणपत्र देण्याचे आरोग्य विभागाने सुरू केल्याने आपली तपासणी करण्यासाठी पालघरच्या आरोग्य केंद्राबाहेर मोठी रांग लागली आहे. आरोग्य तपासणी करणाऱ्या व्यक्तींचे नाव,आधार क्रमांक व इतर माहिती एका फॉर्ममध्ये भरून त्या अर्जावर संबंधित इसमाला कोविंड ची लक्षण नसल्याचे प्रमाणपत्र दिले जात आहे. याकामी तीन वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी व सहा- सात कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.

विशेष म्हणजे या दाखल्यांच्या आधारे आपल्याला इतर जिल्ह्यांमध्ये प्रवास करणे शक्य होईल असा भाबडा समज अनेक जमा झालेल्या नागरिकांमध्ये असून ही गर्दी वाढत चालली आहे. यापैकी अनेक जण सकाळपासून या रांगेत ऊभे राहिल्याने अशा भुकेल्या- तहानलेल्या आलेल्या व्यक्तींना सेवाभावी संस्थानी मदतीचा हात पुढे केला. एकीकडे टाळेबंदीत अडकलेल्या परप्रांतीय व इतर जिल्ह्यातील नागरिकांची संख्या मोठी असल्याने या सर्वांची वैद्यकीय तपासणी  करून घेण्यासाठी एकच गर्दी झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान या विषयी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता, अशा कोणत्याही वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले. तसेच दाखले देण्याचे काम स्थगित करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.