केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणांमुळे बँकिंग क्षेत्र मोठय़ा प्रमाणात अडचणीत सापडले असून, अर्थव्यवस्थेचाही मोठा बोजवारा उडाला आहे. नोटाबंदीच्या निर्णयाने सहकारी बँका, सामान्य माणूस उद्ध्वस्त झाला, मात्र अदानी आणि अंबानींचे भले झाले. काळा पैसा बाहेर आलाच नाही, उलट नीरव मोदी, मेहुल चोकसी आणि मल्या यांनी देशातील राष्ट्रीयीकृत बँकांमधून ठेवीदारांचे कोटय़वधी रुपये पळवून नेले. त्यांच्या वसुलीचे काय? असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.

बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेस माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, डॉ. विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, उपाध्यक्ष कैलास तांबे, अध्यक्ष नंदू राठी, जि.प. सदस्या रोहिणी निघुते, रामभाऊ  भुसाळ, गीताताई थेटे, बँकेचे उपाध्यक्ष अशोक असावा यांच्यासह संचालक या प्रसंगी उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणांमुळे अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ठेवीदारांचे २५ कोटी रुपये घेऊन नीरव मोदी, मेहुल चोकसी आणि मल्या हे भगोडे पळून गेले. त्यांचा पैसा तुम्ही कसा वसूल करणार? असा सवाल विखे पाटील यांनी केला. नोटाबंदीनंतर काळा पैसा जमा झालाच नाही. उलट छोटा दुकानदार आणि व्यावसायिक उद्ध्वस्त झाला आणि अदानी-अंबानींचे भले झाले, अशी टीकाही त्यांनी केली.

प्रवरा सहकारी बँकेच्या माध्यमातून वितरित करण्यात येणारे शेती कर्ज, गोल्ड लोन यांचे व्याजदर कमी करण्याची घोषणा त्यांनी केली. शेतकरी, सभासदांना देण्यात येणाऱ्या गोल्ड लोनमध्ये ३ टक्के रिबेट देण्याचा प्रस्ताव रिझव्‍‌र्ह बँकेकडे पाठवला असून, त्याचाही लाभ सभासदांना देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.