आधुनिक माध्यम प्रणालीची चांगली ओळख व्हावी, पत्रकारितेच्या अनुषंगाने प्रबोधन व्हावे यासाठी नजीकच्या काळातच पत्रकारांसाठी राज्यभर विभागवार पत्रकार कार्यशाळांचे आयोजन करण्यात येईल. या कार्यशाळेचा लाभ पत्रकारांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांनी पोंभुल्रे ता. देवगड येथे केले.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी पोंभुल्रे व जांभेदेऊळवाडी  ग्रामस्थ व जांभेकर कुटुंबीयांच्या संयुक्त सहकार्याने पोंभुल्रे येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मारक दर्पण सभागृहात आयोजित समारंभात जोशी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी  महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ हे होते.

दिव्याखाली अंधाराप्रमाणे सध्या पत्रकारांची अवस्था आहे, अशी खंत व्यक्त करून जोशी म्हणाले की, सामाजिक दायित्व, सामाजिक बांधिलकीच्या जाणिवतेतून पत्रकार अहोरात्र कार्यरत असतात. या परिस्थितीत पत्रकार स्वत:च्या आरोग्याकडे, कौटुंबिक प्रश्नाकडे एकूण स्वत:च्या कोणत्याच बाबतीत लक्ष देत नाही, पण याकडे आता त्यांनी गांर्भीयाने लक्ष द्यायला हवे. याच भावनेतून राज्यातील सर्व पत्रकारांसाठी विभागावर  कार्यशाळा घेण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तसेच दुर्गम भागातून मुंबईकडे प्रयाण करून बाळशास्त्री जांभेकरांनी कमी कालावधीत प्रचंड कार्य केले. त्यांच्या जन्मभूमीत नतमस्तक होण्यासाठीच मी आज मुद्दाम आलो आहे, असे सांगून जोशी यांनी राज्य अधिस्वीकृतीच्या समितीच्या माध्यमातून पत्रकारांसाठी विविध सुविधा देण्यासाठी मी कार्यशील राहणार असल्याचे सांगितले. दर्पण पुरस्कारप्राप्त पत्रकारांचेही त्यांनी यावेळी अभिनंदन केले.

यदू जोशी यांच्या हस्ते दर्पण पुरस्कारप्राप्त पत्रकारांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनकार्यविषयक पुस्तके देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यामध्ये पुणे विभाग-विश्वास पाटील कोल्हापूर, कोकण विभाग- पद्मभूषण देशपांडे, मुंबई, नाशिक विभाग- सुरेशचंद्र भटेवरा, नवी दिल्ली , अमरावती विभाग-  राजेश राजोरे,  नागपूर विभाग- क्रांतीकुमार नालमवार, नागपूर ,औरंगाबाद विभाग- सतीश टाकळकर , महिला दर्पण पुरस्कार प्रगती बाणखेले, मुंबई, पत्रकार साहित्यिक पुरस्कार .सु.मा.कुलकर्णी नांदेड, विशेष दर्पण पुरस्कार  सी. एन. शहा ज्येष्ठ पत्रकार (सातारा), विनोद  कुलकर्णी व सूर्यकांत भिसे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

समारंभास पोभुल्रे सरपंच सादिक डोंगरकर, मधुकर जांभेकर, सुधाकर जांभेकर, शांताराम गुरव, पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष बापुसाहेब जाधव, कार्यकारी विश्वस्त विजय मांडके तसेच देवगड शहरातील पत्रकार व देऊळवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.