मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा

गुरू-ता-गद्दी २००८ सालच्या त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्त गुरुद्वारा परिसरातील विविध कामे पूर्ण करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने गुरुद्वारा बोर्डाला बिनव्याजी स्वरूपात दिलेले ६१ कोटी रुपये माफ करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली.

शीख समाजाचे शेवटचे देहधारी गुरू श्री गुरू गोविंदसिंघजी यांच्या ३५० व्या जयंतीच्या समारोपाचा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये गुरुद्वारा परिसरात पार पडला, या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाबा कुलवंतसिंघजी, बाबा बलिवदरसिंघजी, बाबा नरेंद्रसिंघजी, आमदार हेमंत पाटील, आमदार डॉ. तुषार राठोड, गुरुव्दारा बोर्डाचे अध्यक्ष आमदार तारासिंग, भाजपा जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, संतुक हंबर्डे, प्रवीण साले आदींची उपस्थिती होती.

गुरू-ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने नांदेड शहरात कोटय़वधी रुपयांची कामे करण्यात आली. यातील महत्त्वाची कामे गुरुद्वारा परिसरातील होती. ती पूर्ण करण्यासाठी काँग्रेस आघाडी सरकारने गुरुद्वारा बोर्डाला ६१ कोटी रुपये दिले होते.

कालांतराने ही रक्कम परत करण्याची अट त्यावेळी घालण्यात आलेली होती. त्यानुसार सोहळा पार पडल्यानंतर शासनाच्या नियोजन व अर्थ विभागाकडून ६१ कोटी रुपये परत करण्याबाबत गुरुद्वारा बोर्डाला वारंवार कळविण्यात आले होते. त्याच वेळी शीख समाजाने ही रक्कम वसूल न करण्याची मागणी वारंवार केली होती. मात्र, काँग्रेस आघाडी सरकारने हा विषय २०१४ पर्यंत तसाच प्रलंबित ठेवला. विद्यमान सरकारच्या तीन वर्षांच्या काळातही तो प्रलंबितच होता. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ६१ कोटी रुपये माफ करण्याची घोषणा करून गुरुद्वारा बोर्ड व शीख समाजाला नववर्षांची अनुपम भेट दिली. मुळात गुरुजींकडून घ्यायचे असते. द्यायचे नसते असे सांगत जे ६१ कोटी रुपयांचे कर्ज आम्ही माफ केले, येणाऱ्या काळात गुरुजींच्या आशीर्वादाने राज्याच्या तिजोरीत ६१ हजार कोटी रुपये जमा होतील, असा आशावाद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. श्री गुरुगोविंदसिंघजी यांच्या कार्यातून भक्ती-शक्तीचा संगम निर्माण झाला. या प्रेरणेतून स्वाभिमानी समाज घडला आहे. त्याग, बलिदानाची परंपरा असलेल्या श्री हुजुरसाहिब गुरुव्दाराचे दर्शन घेऊन ऊर्जा प्राप्त होते, असे उद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.

श्री गुरुगोवदसिंघजी यांचे ३५० वे जन्मशताब्दी वर्ष केंद्राने सोहळा म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला. देशात उत्सव साजरे झाले.  हा सोहळा साजरा करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य समजतो, असे फडणवीस यांनी सांगितले. सोहळयाचे प्रास्ताविक आमदार तारासिंग यांनी केले.

गुरुव्दारा परिसरातील नशापानावर बंदी आणू

गुरुव्दारा परिसरात जो नशापान केला जातो, त्या लोकांचा निश्चित बंदोबस्त केला जाणार आहे, इतक्या मोठय़ा धार्मिक स्थळी होणारा नशापान खपवून घेतला जाणार नाही. पोलीस प्रशासन कारवाई करील, असे आश्वासन या वेळी फडणवीस यांनी दिले.