खोटं बोल पण रेटून बोल हे महाविकास आघाडी सरकारचं धोरण आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. देशातले सगळ्यात जास्त रुग्ण ज्या राज्यात आहेत त्या सरकारमधले मंत्री स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला मित्र कोण आणि शत्रू कोण हे चांगलंच माहित आहे. सरकारला आम्ही मदतच करतो आहोत. मात्र सरकारच्या वतीने फेकाफेक केली जात असेल तर त्याचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले आहेत फडणवीस?
मी घेतलेल्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी तासन् तास बैठका घेऊन संयुक्त पत्रकार परिषद घ्यावी लागली. एवढ्या बैठका करोनाविरोधातली लढाई लढण्यासाठी घेतल्या असत्या तर महाराष्ट्राची आज ही अवस्था झाली नसती.

खरं बोलायचं असेल तर एकच माणूस पुरेसा असतो. मात्र फेकमफाक करायची असेल तर तीन माणसं लागतात अशाच प्रकारे तीन मंत्र्यांनी एकत्रित येऊन पूर्णपणे विसंगत माहिती देऊन माझ्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला आहे.

एक तर त्यांच्याकडे असलेली माहिती अपुरी आहे. माहिती न घेता आले आहेत किंवा माहिती असूनही ते चुकीचं बोलत आहेत.

अनिल परब विचारत आहेत की गहू कुठे आहेत? गहू आम्हाला मिळाला नाही. मी कालदेखील हेच सांगितलं की २ रुपये किलो आणि ३ रुपये किलो हा जो गहू तुम्ही अन्न सुरक्षे अंतर्गत देत आहात तो केंद्र सरकारने दिलेलाच गहू आहे. २४ रुपये आणि ३२ रुपये किलोने घेतलेला हा गहू आहे. तरीही हा गहू कुठे आहे असा प्रश्न परब यांना का पडला हे मला समजत नाही.

एका ट्रेनचा खर्च ५० लाख रुपये हा मी ठरवलेला नाही तर रेल्वे मंत्र्यांनी तो घोषित केलेला खर्च आहे तुम्हाला एका ट्रेनसाठी ७ ते ९ लाख रुपये खर्च येतो तर रेल्वे मंत्रालयाला तो खर्च ५० लाख रुपये येतो

कापूस खरेदीच्या संदर्भात सगळे पैसे केंद्र सरकारच देतं. ते पैसेही दिले आहेत.

२६ मेपर्यंत महाराष्ट्राला १० लाख पीपीई किट्स आणि जवळपास १६ लाख मास्क दिले आहेत ही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिलेली माहिती आहे

महाराष्ट्रात चाचण्या जास्त होत आहेत त्यामुळे रुग्णसंख्या वाढली आहे हे पूर्णपणे असत्य आहे. मुंबईत तर टेस्टची संख्या कमी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात झालेल्या टेस्टमधले १३ ते साडेतेरा टक्के रुग्ण हे पॉझिटिव्ह निघतात. मुंबईत हे प्रमाण ३२ टक्के आहे. मग कशाच्या जोरावर हे सरकार आपली पाठ थोपटून घेत आहे? असाही प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.