देवेंद्र फडणवीस यांना कदाचित WHO ही मार्गदर्शनासाठी बोलावू शकते असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी आज पुरेशा चाचण्या होत नाहीत महाराष्ट्रात करोना मृत्यूंचं प्रमाण वाढलं आहे, करोनावर उपाय योजना करण्यात काहीसं अपयश आलंय असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू आहेत. बडी आसामी आहे. त्यांना कदाचित WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनाही मार्गदर्शनासाठी बोलावतील असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या एबीपी माझाच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

करोनाचं संक्रमण रोखणं, त्याचा वेग मंदावणं हे महत्त्वाचं आहे. गर्दी टाळा, सतत हात धुवा, मास्क लावा हे सगळे नियम पाळा असं वारंवार सांगितलं जातं आहे. आपण सध्या अनलॉकच्या प्रक्रियेतच आहोत. काही ठिकाणी पुन्हा लॉकडाउन करावं लागलं कारण ते करोनाच्या प्रसारावर अवलंबून होतं. त्यामुळे तिथे लॉकडाउन करावा लागला असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

आपण निर्णय घ्यायचा असतो आणि प्रशासनाकडून काम करुन घ्यायचं असतं असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच चष्मा लावायला हरकत नाही पण डोळ्यावर झापडं लावू नका असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आपण करोनाच्या काळात रुग्णालयं उभारली आहेत, आवश्यक त्या सगळ्या उपाय योजना केल्या आहेत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. करोना विरोधातला लढा सुरु आहे. पण कुणीही गाफिल राहू नका असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते फडणवीस?
सरकारमध्ये कुठलाही समन्वय दिसत नाही. मुख्यमंत्री प्रशासनावर अवलंबून आहेत. त्यात काहीही चुकीचं नाही. पण आता प्रशासनाला नेतृत्वाला देण्याची गरज आहे. उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा पूर्ण होत नाहीत. खूप सावधपणे, संभाळून पावले उचलतात. त्यामुळे निर्णय होत नाहीत. आता ते मुख्यमंत्री होऊन आठ-नऊ महिने झाले आहेत. त्यामुळे असे संभाळून निर्णय घेणे, आता चालणार नाही. अशी टीका देवेंद्र फडणीस यांनी केली होती. त्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी खुमासदार शैलीत उत्तर दिलं आहे.