शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांची मुलाखत घेतली असून त्याचा रविवारी दुसरा भाग प्रसिद्ध झाला आहे. मात्र, मुलाखत म्हणजे डब्ल्यूडब्ल्यूएफ किंवा नुरा कुस्ती आहे… मॅच फिक्सिंग आहे, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते पत्रकारांशी बोलत होते.

या मुलाखतीबद्दल फडणवीस यांना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, मॅच फिक्सिंग एकदा संपू द्या. योग्य वेळी मी त्यावर प्रतिक्रिया निश्चित देईल.

राऊतांनी करोनाकडे लक्ष द्यावं…
करोनाच्या या संकटात राजकारण केलं जातंय, सरकार पाडायचा प्रयत्न होतोय, ही ती वेळ नाही असं खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्याबद्दल विचारलं असता फडणवीस यांनी सांगितलं की, “स्वतःच मारून घ्यायचं आणि स्वतःच रडायचं ही एक नवीन पद्धत आहे. ती पद्धत जर अवलंबली तर आपल्या अपयशापासून लोकांची नजर बाजूला होते. त्यातलाच हा प्रकार आहे. कोणीही सरकार पाडत नाहीये. आपणच कांगावा करायचा, त्याच्यावर मुलाखती करायच्या, त्याच्यावरच बोलायचं, जेणेकरून करोनाचे प्रश्न दूर होतील, असा हा प्रयत्न आहे. मला वाटतं त्यांनी करोनाकडे लक्ष द्यायला हवं.”

आदित्य ठाकरे यांनाही उत्तर
फडणवीस यांच्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘डिझॅस्टर टुरिझम’ अशी टिका केल्यानंतर फडणवीस यांनी या टीकेला उत्तर दिलंय. नया है वहं, म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटतात त्यांना मंत्री बनवता येतं. पण मंत्री बनवल्यानं शहाणपण येतंच असं नाही ना? ते (आदित्य ठाकरे) नवीन आहेत. माझ्यासारख्या माणसानं त्यावर फारकाही प्रतिक्रियाही देऊ नये.”