पाताळाची चर्चा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना तो शरजील पुण्यात आला, हे माहिती नव्हतं का? असा सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. तसेच, यावेळी त्यांनी ठाकरे सरकारमधील दोन मंत्र्यांवर गंभीर आरोप देखील केले आहेत. यावेळी शेलार यांच्यासोबत भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांची देखील उपस्थिती होती.

शेलार म्हणाले, “पाताळाची चर्चा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना तो शरजील पुण्यात आला, हे माहिती नव्हतं का? माध्यमांमधून माहिती समोर येत आहे. आम्ही त्याही वेळेला म्हटलं होतं की, हिंदुंना सडक्या मनोवृत्तीचा म्हणणारा, हिंदू विरोधी बोलणारा, हिंदू धर्माचा अपमान करणारा शरजील इथल्या भाषणानंतर पळून कसा गेला? त्या भाषणानंतर काही दिवस तो मुंबईत होता. त्याला या मुंबईतून बाहेर जाण्यासाठी ग्रीन चॅनल कुणी दिला? सरकारमधील कोणत्या मंत्र्याने दिला? त्या ग्रीन चॅनलमधून त्याला पळवण्यााच मार्ग खुला कुणी केला? त्यानंतर आज परत रेड कार्पेट कुणी दिला? आमचा आरोप आहे की सरकारमधील दोन मंत्र्यांचा या मागे हात आहे. त्या दोन मंत्र्यांचं कामचं हिंदू विरोधी कुणी काही म्हटलं तर त्याचं समर्थन व प्रदर्शन करणं आहे. हिंदू धर्माला कुणी शिव्या दिल्या की या ठाकरे सरकारमध्ये बसलेल्या दोन मंत्र्यांच्या मनात उकळ्या फुटतात आणि मग दबावाचं राजकारण मुख्यमंत्री कार्यालयाकडे येतं का? असा संशय बळावतो.”

तर, या अगोदर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरजीलच्या मुद्यावरून  राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ठाकरे सरकावर जोरादरा टीका केली होती.

शरजील उस्मानीच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही, आणि… – देवेंद्र फडणवीस

“शरजील उस्मानी हा उत्तर प्रदेशचा असल्याचं मुख्यमंत्री सांगत होते, पण त्या शरजील उस्मानीची हिंदुंच्या विरुद्ध उत्तर प्रदेशात बोलायची हिंमत नाही. तो तुमच्या आमच्या महाराष्ट्रात येतो आणि पुण्यात येऊन बोलून जातो. त्याच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही, हे या सरकारचं हिंदुत्व ते आम्हाला सांगत होते.” अशा शब्दांमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना शरजील उस्मानीच्या मुद्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.