बार्शीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सूचक विधान

१९९५ ते ९९ या कालावधीत तत्कालीन सत्ताधारी सेना-भाजप युतीला पाठिंबा दिलेले बार्शीचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल हे पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे. बार्शीत आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार सोपल यांनी आता जय महाराष्ट्र म्हणण्याची वेळ आल्याचे सूचक विधान करीत शिवसेना प्रवेशाचे संकेत दिले. तथापि, यासंदर्भात अधिकृत निर्णय येत्या आठवडाभरात घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

यापूर्वी पुण्यात बार्शी मित्र मंडळाच्या मेळाव्यातही आमदार सोपल यांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कायम राहायचे की अन्य दुसऱ्या पक्षात प्रवेश करायचा याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर बार्शीत समर्थकांच्या मेळाव्यातही त्यांच्या पक्षांतराविषयी चर्चा उपस्थित झाली.

स्थानिक नेते विनायकराव गरड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात आमदार सोपल यांनी आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सूतोवाच केले. आता ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याची वेळ आल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सोपल समर्थकांनी मते मांडताना शिवसेनेत प्रवेश करण्याचा आग्रह धरला. आमदार सोपल यांचे नातू आर्यन सोपल यांनी शिवसेना प्रवेशाचा धागा पकडला. गेल्या चार महिन्यात बार्शीच्या ४६ गावांतून संवादयात्रा काढून जनतेचा कल जाणून घेतला असता सर्वानीच सोपल हाच पक्ष मानून त्यांच्या पाठीमागे राहण्याचा निर्धार केला आहे. परंतु आता सत्तेच्या माध्यमातून बार्शीकरांची विकासकामे पूर्ण करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडण्यात आल्याचे आर्यन सोपल यांनी  सांगितले. २००४ सालचा अपवाद वगळता १९८५ पासून ते आजतागायत सोपल हे विधानसभेवर प्रतिनिधित्व करतात. युती शासनाच्या काळात ते राज्यमंत्री होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून आतापर्यंत ओळख जपलेले सोपल हे २०१४ पूर्वी राज्यात आघाडी सरकारमध्येही काही काळ मंत्री होते.

आमदार सोपल यांनीही शिवसेना प्रवेशाविषयी सूतोवाच करताना असा राजकीय निर्णय घेणे हे आपणास काही नवीन नाही. यापूर्वी १९९५ साली अपक्ष आमदार असताना आपण शिवसेनेला पाठिंबा दिला होता. आतापर्यंत आपण कोठेही उघडपणे दिंडी दरवाजातूनच प्रवेश केला आहे. विरोधकांप्रमाणे या बिळातून त्या बिळात गुपचूपपणे जाण्याची आपणास सवय नाही, अशा शब्दांत आपले राजकीय विरोधक तथा भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना नामोल्लेख टाळून टोला लगावला.