सतीश कामत

फळांचा राजा मानला जाणाऱ्या रत्नागिरी हापूसचे वेगळेपण राखण्यासाठी भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळवल्यानंतर आता बाजारपेठेत त्याच्या असलीपणाबाबत ग्राहकांचा विश्वास मिळवण्यासाठी ‘जीआय’प्राप्त बागायतदारांच्या फळांवर ‘क्यूआर कोड’ देण्याचा प्रयोग करण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर रत्नागिरीतील दोन बागायतदारांना प्रत्येकी दहा हजार कोड देण्यात आले असून येत्या काही दिवसांत तसे स्टिकर लावलेली फळे नवी मुंबईतील बाजारात दिसणार आहेत.

दोन वर्षांपूर्वी कोकणच्या आंब्याला हापूस नावाने भौगोलिक निर्देशांक प्राप्त झालेला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व ठाणे ग्रामीण या पाच जिल्ह्यांतील आंबा हापूस नावाने बाजारात दाखल होईल. कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था, केळशी आंबा उत्पादक संघ, देवगड आंबा उत्पादक संघ आणि कोकण कृषी विद्यापीठ यांच्यामार्फत तसे प्रमाणपत्र बागायतदारांना दिले जाते. आतापर्यंत आठशेपेक्षा जास्त बागायतदार, प्रक्रियादार आणि व्यावसायिकांनी ते घेतले आहे. बाजारपेठेत हापूसचा ब्रॅण्ड विकसित करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होत आहे.

पण याच हंगामात इतर राज्यांमधून, विशेषत: कर्नाटकातून येणाऱ्या आंब्याची हापूसबरोबर केली जाणारी भेसळ, येथील आंबा उत्पादकांसाठी न टाळता येणारी डोकेदुखी असते. त्यावर उपाय म्हणून उत्पादक सहकारी संस्थेने हा ‘क्यूआर कोड’चा प्रयोग हाती घेतला आहे. याअंतर्गत रत्नागिरीतील आंबा बागायतदार डॉ. विवेक भिडे आणि सलील दामले यांना क्यूआर कोड असलेले प्रत्येकी दहा हजार स्टिकर देण्यात आले असून हा आंबा दोन दिवसांत नवी मुंबईतील बाजारात दाखल होणार आहे.

अस्सल फळ कसे ओळखाल?

प्रत्येक ‘जीआय’ मानांकित बागायतदाराला हा संकेतांक दिला जाणार आहे. ग्राहकाने तो स्कॅन केला की त्या फळाची सविस्तर माहिती वेबसाइटवरून मिळू शकेल. तो कोणत्या शेतकऱ्याच्या बागेतून आला आहे, वापरकर्ता कोण, जीआय प्रमाणपत्र आहे का, फळातील पोषणमूल्ये कोणती आहेत याची सविस्तर माहिती त्यात मिळेल. तसेच संपूर्ण व्यवहारात पारदर्शकताही येणार आहे. या महिन्यात त्याची सार्वत्रिक अंमलबजावणी केली जाणार आहे.

यंदा क्यूआर कोडचे एक लाख स्टिकर तयार करण्यात आले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर दहा शेतकऱ्यांची निवड केली आहे. त्याची माहिती जीआयच्या सॉफ्टवेअरमध्ये टाकली जाईल. या माध्यमातून अस्सल हापूस कसा ओळखावा, हे लोकांपर्यंत पोहोचणे शक्य होईल.

– डॉ. विवेक भिडे, अध्यक्ष, कोकण हापूस आंबा उत्पादक संस्था