News Flash

द्रुतगती मार्गावरतात्पुरती टोलमुक्ती

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दुरुस्तीच्या कामामुळे वाहनचालकांची होणारी गैरसोय आणि लागणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा यामुळे या काळात सकाळी १० ते सायंकाळी सहापर्यंत छोटय़ा वाहनांना टोलमाफी

| July 27, 2015 06:25 am

संग्रहित छायाचित्र

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दुरुस्तीच्या कामामुळे वाहनचालकांची होणारी गैरसोय आणि लागणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा यामुळे या काळात सकाळी १० ते सायंकाळी सहापर्यंत छोटय़ा वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने घेतला आहे. हे काम अजून १० ते १५ दिवस सुरू राहील अशी चिन्हे आहेत.
गेल्या रविवारी दरड कोसळून द्रुतगती मार्गावर तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या मार्गावरील धोकादायक दरडी हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महामार्गावरील वाहनांची वर्दळ लक्षात घेता कमीत कमी त्रास होईल, अशा पद्धतीने काम हाती घेण्यात आले आहे. महामार्गावर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने टोल वसूल केला जाऊ नये, अशी मागणी काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ आणि नितेश राणे यांनी शुक्रवारी सार्वजनिक बांधकामंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्याकडे विधान भवनात केली होती. तसेच युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांनी तशी सूचना केल्याने शिंदे यांनी दुरुस्तीचे काम सुरू असताना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत छोटय़ा वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ते विकास मंडळाने तसा आदेश जारी केला आहे.
दरडी हटविण्याचे काम सुरू
गेल्या आठवडय़ात दरड कोसळल्यावर या मार्गावरील धोकादायक भागांचा आढावा घेण्यात आला. तेव्हा दोन-तीन ठिकाणी मोठे दगड केव्हाही कोसळू शकतात, असे आढळून आले. या दरडी हटविण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आले. हे काम झाल्यावर विदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यात दरडी कोसळणार नाहीत यासाठी खबरदारीचे उपाय योजण्यात येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. काही ठिकाणी डोंगरावरील मोठे दगड पाणी मुरून ठिसूळ झाले आहेत. यावरही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे प्रक्रिया केली जाणार आहे.

द्रुतगती मार्गावरील वाहतूक जुन्या मुंबई-पुणे मार्गावर वळवल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. रविवारीही कोंडीमुळे प्रवाशांबरोबरच स्थानिकांचेही हाल झाले. दोन्ही मार्गावरील अवजड वाहतूक दिवसा बंद ठेवण्याची मागणी होत आहे. जुन्या मार्गावरून अवजड व हलकी वाहने सोडण्यात येत असल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2015 6:25 am

Web Title: express way temporary toll free
Next Stories
1 ‘एकावर एक मोफत’ योजनांचा मेळा!
2 ‘कार्यकर्ते संध्याकाळी पुन्हा काँग्रेसच्याच दावणीला येतात ’
3 इतर मागासवर्गीयांची आकडेवारी जाहीर करण्यासाठी आंदोलन
Just Now!
X