मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियातून जनतेशी लाईव्ह संवाद साधला. यावेळी त्यांनी करोनाच्या सध्याच्या स्थितीबाबत, अनलॉकबाबत बोलताना जनतेला संदेशही दिला. मात्र, त्यांच्या या संबोधनावर भाजपाने टीका केली आहे. जनतेच्या नाराजीची दखल घेण्याऐवजी त्यांच्यावरच नाराजी व्यक्त करणारं हे भाषण होतं, असं भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या संबोधनानंतर उपाध्ये यांनी ट्विट करुन त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, “नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांचे निराश करणारे फेसबुक लाईव्ह. जनतेच्या नाराजीची दखल न घेतां जनतेवरच नाराजी व्यक्त करणारे संबोधन. यामध्ये वाढीव वीजबिलाबाबत जनतेला काहीही दिलासा नाही की शेतकऱ्यांना काही मदत नाही. तसेच राज्यातील समस्यांवर काही उपाय नाहीत. ना ठोस कृती, ना उपाय.”

दरम्यान, लॉकडाउनच्या काळात बंद असलेल्या गोष्टी हळूहळू उघडण्यात येत आहेत. मात्र, पुन्हा संसर्ग वाढू नये म्हणून याबाबत खबरदारी घेतली जात आहे. कारण जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे, हे उघडा ते उघडा असं सांगणाऱ्यांवर नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. करोनाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे अजूनही आपण शाळा उघडू शकलेलो नाही, याबाबत निर्णय घेतला आहे. पण अजूनही शाळा उघडू शकू की नाही हे प्रश्नांकित आहे, असंही ते यावेळी म्हणाले.