बनावट देशी-विदेशी दारू तयार करण्याचा कारखाना सांगलीतील दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने वाळवा तालुक्यातील पेठ येथे सोमवारी उद्ध्वस्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून दोघेजण फरार झाले आहेत. अवैध दारू निर्मिती केंद्रावर सुमारे दोन लाखांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की वाळवा तालुक्यातील पेठ गावी गोळेवाडी रस्त्यावरील माणकेश्वर गल्लीत अवैध दारू निर्मिती केली जात असल्याची माहिती भरारी पथकास मिळताच पोलीस निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी आयुक्त संगीता दरेकर व अधीक्षक प्रकाश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यरात्री छापा टाकला. या वेळी सुधीर अर्जुन शेलार (वय २१) व सुनील अशोक गुरव (वय ३४) हे दोघे पथकाच्या तावडीत सापडले, मात्र विजय कदम आणि सागर साळुंखे हे दोघे परागंदा झाले.
या ठिकाणच्या अवैध दारू निर्मिती केंद्रावर ११० लीटर स्पिरीटचा साठा मिळाला असून, बनावट बॅगपाईपर १८० मिली दारूचे ११ बॉक्स, बनावट संत्रा देशी दारूचे दोन बॉक्स, बनावट दारू निर्मितीसाठी आवश्यक असलेले रसायन, विविध दारू कंपन्यांचे लेबल्स, दारूच्या रिकाम्या बाटल्या, बाटल्या सीलबंद करण्यासाठी लागणारी ८०० टोपणे, रिकाम्या देशी व विदेशी मद्याच्या दारूच्या २ हजार बाटल्या आणि दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी बजाज पल्सर दुचाकी क्र. एमएच १० बीएच ३००३ असा माल जप्त करण्यात आला. तसेच या ठिकाणी बिसलरी पाण्याचे २० लीटरचे १२ कॅन, ३५ लीटरचे ४ रिकामे कॅन जप्त करण्यात आले आहेत.
बनावट दारू निर्मितीसाठी साठा करण्यात आलेले स्पिरीट कोठून आणले याचा तपास लागणे महत्त्वाचे असल्याने अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून अद्याप माहिती मिळालेली नसल्याचे  कोरे यांनी सांगितले. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात स्पिरीट स्थानिक पातळीवर उपलब्ध होणे अशक्य असल्याने याचा पुरवठा परराज्यातून होत असावा, असा संशय असून बनावट दारू उत्पादन करण्याचा कारखाना गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असल्याची आरोपींनी कबुली दिली आहे.