News Flash

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजू शेट्टींसोबत शेतकऱ्यांचं जागर आंदोलन

पिठलं-भाकरी खाऊन आणि भजन करत मोदी सरकारचा निषेध

कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजू शेट्टींसोबत शेतकऱ्यांचं जागर आंदोलन सुरु झालं आहे. केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायद्यांचा निषेध नोंदवण्यासाठी हे आंदोलन सुरु झाले आहे. पंजाब आणि हरयाणा या राज्यांमधल्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. शेतकऱ्यांना सरकारने चर्चेसाठी बोलावलं होतं. मंगळवारी आणि गुरुवारी चर्चेच्या फेऱ्या झाल्या. मात्र तरीही शेतकऱ्यांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलेलं नाही. शेतकऱ्यांची एक समिती तयार केली जावी आणि तिच्याशी आम्ही चर्चा करु असं सरकारनं म्हटलं होतं. मात्र हे शेतकऱ्यांना मान्य नाही. आता शेतकऱ्यांची पुढील चर्चा ५ डिसेंबरला होणार आहे. दरम्यान या आंदोलनाला राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेनेही पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळेच कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु करण्यात आलं आहे.

सरकारच्या छाताडावर बसू, साखर सम्राटांना उसाच्या दांडक्याने फोडून काढू… अशी तिखट भाषा उच्चारणारे शेतकरी नेते आणि शेतकरी गुरुवारी रात्री भजनात रंगले होते. ‘तो हा विठ्ठल बरवा.. तो हा माधव बरवा’ चा गजर रात्र जागवत राहिला. निमित्त होते नवी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आयोजित केलेल्या ‘जागर आत्मक्लेश आंदोलनाचे’.

शेतकरी संघटनांच्या नेत्यांची भाषणे म्हणजे गावरान तडका असतो. शासन, साखर सम्राट, बाजार समितीतील गब्बर नेते यांना लक्ष्य करताना त्यांच्या मुखातून खणखणीत शब्द बाहेर पडत असतात. इतकेच नव्हे तर शेतकरी नेते एकमेकांची उणीधुणी काढतानाही ठेवणीतल्या शब्दांचा स्वैर वापर करीत असतात. आज मात्र हे चित्र बदलले होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनात भक्ती गीतांचा मळा फुलला होता.

नवी दिल्ली येथील शेतकरी आंदोलन पाठिंबा देण्यासाठी आज रात्री राज्यभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जागर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले होते. केंद्र शासनाचा कायदा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याने तो मागे घेण्यात यावा. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. हे आंदोलन करीत असतानाच त्यांनी नेहमीची भाषणबाजी बाजूला ठेवून टाळ-मृदुंगाच्या संगतीने भजन सुरू केले. ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’, ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे आपले’ यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनस्थळी ज्ञानोबा- तुकोबा यांच्या भजनांचा जागर रंगला होता. त्यामुळे शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला आज सुरेल साथ लाभल्याचे दिसून आले. सुरांच्या साथीने रात्र जागवण्यात पक्षाचे प्रदेश अध्यक्ष प्रा. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, सागर संभूशेटे, शैलेश आडके, विक्रम पाटील, मिलिंद साखरपे आदी सहभागी झाले होते.

पुण्यातही आंदोलन 

केंद्र सरकारच्या कृषी विधेयक कायद्याच्या निषेधार्थ दिल्ली येथे शेतकऱ्याचे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ कोल्हापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जागर आंदोलन केले जात आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर भजन कीर्तन आणि पिठलं भाकरी खाऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला जात आहे. तर पुण्यातील आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यार्थी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अमोल हिपरगी यांनी केले. या आंदोलनात जेष्ठ कामगार नेते बाबा आढाव देखील सहभागी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2020 9:06 pm

Web Title: farmers agitation with raju shetty in front of kolhapur district collector office scj 81 svk 88
टॅग : Raju Shetty
Next Stories
1 महाराष्ट्रात दिवसभरात ८ हजारांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट ९२.७० टक्के
2 महाराष्ट्र कधी घाबरला नाही आणि कधी घाबरणारही नाही – उद्धव ठाकरे
3 सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलेंना ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार
Just Now!
X