22 October 2020

News Flash

‘फसवी कर्जमाफी’; शेतात फ्लेक्स लावत शेतकऱ्यानं फडणवीस, ठाकरे सरकारचे काढले वाभाडे

शेतकऱ्याच्या फ्लेक्सची सर्वत्र चर्चा

आस्मानी संकटामुळं जगाचा पोशिंदा अर्थात शेतकरी कायमचं अडचणीत येत असतो. या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी सरकारं नेहमीच कर्जमाफीची लोकप्रिय घोषणा करतात. प्रत्यक्षात त्याचा फायदा किती शेतकऱ्यांना होतो हा प्रश्न कायमच राहतो. अशाच एका कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्याने उद्विग्न होऊन यापूर्वीच्या फडणवीस आणि आत्ताच्या ठाकरे सरकारचे वाभाडे काढले आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भिलखेड येथील अल्पभूधारक शेतकरी निलकंठ लिपते यांची ही व्यथा आहे. दोन एकर शेती असलेल्या लिपते यांनी २०११ मध्ये दीड लाख रुपयांचं पीककर्ज घेतलं होतं. या कर्जमाफीसाठी त्यांनी मागच्या फडणवीस सरकारच्या काळात अर्ज केला होता. त्यानंतर सध्याच्या ठाकरे सरकारच्या काळातही त्यांनी पीक कर्जमाफीसाठी अर्ज केला. मात्र, या दोन्ही वेळेस त्यांना कर्जमाफी मिळाली नाही.

सरकार दरबारी वारंवार खेटे घालूनही शासकीय योजनांचा फायदा मिळत नसल्याने वैतागलेल्या लिपते यांनी आपल्या शेतातच मोठा फ्लेक्स लावत त्यावर ‘फसवी कर्जमाफी’ या मथळ्याखाली माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो छापत त्यामध्ये ‘या दोन्ही सरकारच्या कालावधीत माझी कर्जमाफी झालीच नाही, त्यामुळे मी एक त्रस्त शेतकरी’ असा संदेश लिहिला. त्याखाली त्यांनी आपलं नाव, संपर्क क्रमांक आणि संपूर्ण पत्ताही लिहिला.

या अनोख्या पद्धतीच्या आंदोलनामुळं गावात आणि माध्यमांनी दखल घेतल्यानंतर आता सर्वत्र या शेतकऱ्याच्या फ्लेक्सची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 12:16 pm

Web Title: fraudulent crop loan waiver farmers planted flex in the field and blame on fadnavis and thackeray government aau 85
Next Stories
1 शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शरद पवार बांधावर, उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी
2 “डोंगर कधीच म्हातारे होत नाहीत”
3 …अन् वारं फिरलं! ‘त्या’ सभेनं महाराष्ट्राच्या राजकारणाला दिली ऐतिहासिक कलाटणी
Just Now!
X