राज्याच्या सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत शिवसेनेने दिले. परंतु ते बाहेर पडल्यास शरद पवारांचा हात घेऊ. शिवसेनेने खुशाल बाहेर पडावे. राज्याचे सरकार स्थिर राहणार असल्याचे सूतोवाच रिपाइंचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार बैठकीत केले. ‘शिवसेनेने खुशाल बाहेर पडावे. गरज पडल्यास आम्ही पवार साहेबांचा हात धरू’ अशी सूचक प्रतिक्रिया देत महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप राष्ट्रवादीचा टेकू घेण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

राज्यात भाजप सरकार चांगले काम करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. या उपरही नरेंद्र मोदींनी यापूर्वी जाहीर केले की, त्यांनी शरद पवारांचे बोट धरून राजकारण शिकले. तसेच शरद पवारांनीही प्रसंगी भाजपला पाठिंबा देण्याचे आधी जाहीर केले होते. त्यामुळे परिस्थिती पाहून आम्हीही पवारांचे बोट धरू,  असे ते म्हणाले.

आठवले यांनी हिंगोली येथील महात्मा गांधी चौकात जाहीर सभा घेतली. त्या सभेत त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर होत असेल तर तो चुकीचा आहे. परंतु दलितांवर होणारा अन्याय थांबविण्यासाठी या कायद्याची तेवढी गरज असून हा कायदा रद्द करणे किंवा दुरुस्त करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. गेल्या काही महिन्यांत दलित आणि सवर्ण यांच्यात संवाद वाढला असून दोन जातींमधील दरी देखील कमी होऊ लागल्याचे त्यांनी सांगितले. आंतरजाती विवाहांना प्रोत्साहन देणे गरजेचे असून त्यासाठी सरकारकडून विविध स्वरुपाच्या प्रोत्साहनपर योजनेमध्ये वाढ केली जात असल्याचे ते म्हणाले. यावेळी तान्हाजी मुटकुळे आदी उपस्थित होते.