गणेशोत्सवात मोठ्याने डीजे आणि डॉल्बी लावणारच असे ठणकावून सांगणाऱ्या उदयन राजे भोसलेंना चंदक्रात पाटील यांनी टोला लगावला आहे. डीजे किंवा डॉल्बीच्या तालावर नाचायचं असेल तर खुशाल मोकळ्या मैदानावर जा असे चंद्रकांत पाटील यांनी सुनावले आहे. प्रत्येक गावात एक मैदान असते त्या मैदानावर जो काही धिंगाणा घालायचा असेल तर तो घाला असा टोला पाटील यांनी लगावला. दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यातील ३१ गावांना टेम्भू जलसिंचन योजनेतून पाणी दिले जाणार आहे. या योजनेचे भूमिपूजन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार उदयन राजे भोसले यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला.

लोकमान्य टिळकांनी घरातला गणपती चौकात आणला कारण त्यांना लोकांना संघटित करायचे होते. आता मात्र चौकातला उत्सव घरात घेऊन जाण्याची वेळ आली आहे असेही मत चंद्रकांत पाटील यांनी नोंदवले. मोठमोठ्याने सिनेमातली गाणी डॉल्बीवर लावण्यापेक्षा भजन लावा असा सल्लाही पाटील यांनी उदयनराजेंना दिला. एवढंच नाही तर सातारा लोकसभा मतदार संघात भाजपाचाच खासदार विजयी होईल असा विश्वासही व्यक्त केला.

काय म्हटले होते उदयनराजे? 

सातारा शहरामध्ये एका गणपती आगमनावेळी उदयनराजेंनी तेथे उपस्थित असणाऱ्या गणेश भक्तांना आणि कार्यकर्त्यांशी स्टेजवरुन संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी डॉल्बी लागलीच पाहिजे असे मत व्यक्त केले. ‘२३ तारखेला विसर्जन आहे तेव्हा पाहू काय होतं आणि काय नाही होतं आणि कसं नाही होतं. डॉल्बी लागलीच पाहिजे, डेसीबल ठरवणारे कोर्ट आणि पोलिस खाते कोण आहेत?

डेसीबल ठरवतात तुमच्या आमच्यासारखे अवली लोक असे मत उदयनराजे यांनी मांडताच कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून त्यांच्या वक्तव्याला समर्थन दिले. पुढे बोलताना एक दोन दिवस त्रास झाला तर सहन करायला हरकत नाही असेही ते म्हणाले. आम्ही खरे गणेशभक्त आहोत. गणपतीला त्रास होत नाही तर इतरांना त्रास व्हायचं काही कारणच नाही. आणि तरीही त्रास झालाच तर एक दोन दिवस सहन केल्यास काही जात नाही असं उदयनराजे म्हणाले होते.