जिल्हाधिकारी कार्यालयात महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या लोकशाहीदिनात एकही तक्रार न आल्यामुळे जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी आश्चर्य व्यक्त केले. यापुढे नागरिकांची गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठी विभागप्रमुखांनी वेळ द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. यापूर्वी तालुकास्तरावरील लोकशाहीदिनातील प्राप्त तक्रारी व त्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती घेण्याचा आदेश त्यांनी दिला.
लोकशाहीदिनात एकही तक्रार न आल्याच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी कासार यांनी संबंधित यंत्रणेची बठक घेतली. उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी पवार, सहायक आयुक्त (समाजकल्याण) छाया कुलाल, सा.बां.चे कार्यकारी अभियंता एस. टी. देशपांडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. सामान्य जनतेचे विविध प्रश्न मार्गी लागावेत, या हेतूने राज्य सरकारने दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाहीदिनाचे आयोजन केले आहे. सुरुवातीला जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारी देण्यासाठी मोठी गर्दी होत असे. नंतर यात काही बदल करून त्याची वाटचाल तालुकास्तरावरून सुरू केली. जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वी मोठय़ा प्रमाणात तक्रारी प्राप्त होत. तक्रारदारांना न्याय मिळत नसल्यामुळे अथवा त्याची योग्य दखल न घेतल्यानेच तालुकास्तरावर तक्रार देण्याची सुविधा असतानाही प्रत्यक्षात तक्रारींचा ओघ मात्र ओसरला आहे.
जिल्हाधिकारी कासार यांनी घेतलेल्या बठकीत अधिकाऱ्यांना नागरिकांची गाऱ्हाणे ऐकून घेण्यास वेळ देण्याच्या सूचना केल्या. तक्रारींचे निराकरण करून तक्रारदारांना समाधान मिळेल, अशा प्रयत्नांची गरज त्यांनी व्यक्त केली.