प्रशांत देशमुख

सेवाग्राम आश्रम संचालकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एन. प्रभू समर्थक समजल्या जाणाऱ्या गटाने सर्व सेवा संघाच्या कार्यकारिणीची बैठक बुधवारी बोलावली होती. या ऑनलाइन बैठकीत सर्व सेवा संघाच्या अध्यक्षपदावरून महादेव विद्रोही यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या जागेवर चंदन पाल यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.

विद्रोही यांनी कार्यकाळ संपूनही बेकायदेशीरपणे काही नियुक्त्या केल्या. सचिव चंदन पाल, आश्रमाचे अध्यक्ष प्रभू, विश्वस्त आशा बोथरा यांना नियमबाहय़पणे  हटविले.  तेलंगणातील कोटय़वधींच्या भूदान जमीन घोटाळय़ाची चौकशी थांबविण्याचा ठपकाही विद्रोही यांच्यावर आज ठेवण्यात आला.  महाराष्ट्र सवरेदय मंडळाचे अध्यक्ष शिवचरण ठाकूर यांनी सर्व सेवा संघाचे पुढील अधिवेशन वध्रेत घेण्याबाबत केलेली विनंती मान्य करण्यात आली. डिसेंबर महिन्यात संघटनेचे अधिवेशन घेऊन नवीन अध्यक्षाची निवड करण्याचे ठरल्याचे व्यवस्थापक विश्वस्त अशोक शरण यांनी आज जाहीर केले.

मात्र हा सर्व घटनाक्रम बेकादेशीर व दुर्दैवी असल्याचे मत महादेव विद्रोही यांनी व्यक्त केले.  या कथित सभेत उपस्थित एकालाही सर्व सेवा संघाची सभा बोलविण्याचा अधिकार नाही. सर्व सेवा संघाच्या घटनेत सचिव किंवा विश्वस्तांनाच सभा बोलविण्याचा अधिकार आहे. तेलंगणातील घोटाळय़ाचा आणि माझा काडीमात्र संबंध नाही.

उलट मी मागणी केल्यावरच तेलंगणा सरकारने भूदान मंडळाच्या सचिवाला अटक केली होती. आता त्या राज्याचे मुख्य सचिव मंडळाची जबाबदारी सांभाळत आहे. आताच या मंडळींना या घोटाळय़ाची आठवण झाल्याबद्दल आश्चर्य वाटते, असे ते म्हणाले.

सर्व सेवा संघाचे पुढील अधिवेशन ६ डिसेंबरला फारूकाबाद (उत्तर प्रदेश) येथे महादेव विद्रोही यांच्या अध्यक्षतेत देशभरातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार असून याच अधिवेशनात सर्व सेवा संघाच्या नव्या अध्यक्षांची अधिकृत निवड होणार असल्याचे सचिव चंद्रकांत चौधरी यांनी सांगितले.