लोकसत्ता प्रतिनिधी
पालघर : पालघर व सफाळा या दोन शहरांना जोडणाऱ्या रस्त्यावरील माकुणसार पुलाचे काम सोमवारी पूर्ण झाले. उद्घाटनानंतर या पुलावरून वाहतूक सुरू करण्याचे प्रयोजन असताना तत्पूर्वीच पर्यायी मार्गाने त्रस्त असलेल्या वाहनचालकांनी त्याचा वापर सुरू केला आहे.
गेल्या वर्षभरापासून या पुलाच्या पुष्ठभागाचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. तुळईवर (गर्डर) सिमेंटचा स्लॅब टाकल्यानंतर पुलाची भार वाहण्याची चाचणी करण्यात आली.
सिमेंटच्या भागावर डांबरीकरण पूर्ण होऊन लगतच्या रस्त्याला पुलाशी जोडण्याचे कामदेखील पूर्ण झाले होते. या पुलाचा भार वाहण्याचा अनुकूल अहवाल व्हीजेटीआयकडून सोमवारी प्राप्त झाल्यानंतर मार्गावरील अडथळे दूर करण्यात आले.
या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुलाच्या उद्घाटनासाठी लोकप्रतिनिधींशी सल्लामसलत करण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाने केला. मात्र अधिवेशन काळात लोकप्रतिनिधी व्यस्त असल्याने या पुलाचे विधिवत उद्घाटन आठवडा अखेरीपर्यंत लांबणीवर पडेल अशी शक्यता होती. दरम्यान या पुलावरून नागरिकांनी उद्घाटनापूर्वी सोमवारी सायंकाळी वाहतूक सुरू केली.
काही तासांसाठी वाहतूक बंद
नव्याने उभारलेल्या पुलाचे विस्तार सांधे (एक्स्पान्शन जॉइंट) बसविण्याचे काम मंगळवारी सुरू केल्याने या पुलावरून काही तासांसाठी वाहतूक बंद करण्यात आली होती. ते काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.