रूग्ण दगावल्याची बातमी त्याच्या नातेवाईकांना देण्यात आली. औरंगाबादपासून जवळच असलेल्या चिखली या गावी त्याचा मृतदेह नेण्यात आला. बाहेरच्या गावातून मृत रूग्णाचे नातेवाईक आले. चार तास त्यांची वाटही बघण्यात आली. त्यानंतर अंत्यविधी करण्याची तयारी सुरु झाली. मृतदेहाला आंघोळ घालण्यात आली, इतर सोपस्कारही पूर्ण झाले. तिरडीवर मृतदेह ठेवण्याची तयारी सुरु असतानाच कुणाच्या तरी लक्षात आले की रूग्ण दगावला नसून त्याचा श्वास सुरु आहे. हे समजताच एकच धावपळ उडाली, जवळच असलेल्या डॉक्टरांना बोलावून खात्रीही करण्यात आली. डॉक्टरांनी मृत जाहीर केलेला रूग्ण जिवंत असल्याचे सांगताच नातेवाईकांनी पुन्हा घाटी रूग्णालय गाठले आणि तिरडीवर ठेवण्याआधी मृत जाहीर केलेला माणूस जिवंत झाल्याची चर्चा रंगली.

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात दुपारच्या सत्रात हा गोंधळ सुरु होता. रुग्णांच्या नातेवाईकांचा गोंधळ काही वेळानंतर घाटीचे अधीक्षक भारत सोनवणे यांच्या दालनात पोहचला. त्यांनतर स्वत: सोनवणे यांनी अपघात विभागात जाऊन रुग्णांची तपासणी केली. काही तज्ज्ञ डॉक्टरांनाही पाचारण केले. त्यानंतर दाभाडे यांच्यावर पुन्हा उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली. दाभाडे यांना लिव्हरला सूज आल्या कारणाने २९ मार्च रोजी घाटी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांची प्रकृती ५ एप्रिल रोजी अधिकच खालावली, त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले. उपचार सुरु असताना शुकवारी सकाळी त्यांना डॉक्टारांनी मृत घोषीत केले.

त्यामुळे नातेवाईकांनी मृतदेह घेऊन चिखली, बदनापुर हे गांव गाठले. अनेक नातेवाईकांना त्यांच्या मृत्युची माहिती देण्यात आली. मात्र अंत्यविधीची तयारी करत असतांना श्वास सुरु असल्याचे लक्षात आल्याने दाभाडे यांचे पुतणे मिलिंद दाभाडे यांनी सांगितले. तर डॉक्टरांनी केलेल्या तपासणीचे अधिक्षक डॉ. सोनवणे यांनी समर्थन केले. बोटांच्या नखाजवळील नसा काही काळ सुरू असतात त्यामुळे रुग्ण जीवंत असल्याचा समज झाल्याचे ते म्हणाले. मात्र रुग्ण मृत आहे की जीवंत याबाबत थेट बोलण्यास त्यांनी नकार दिला.