मुंबईतील मध्य रेल्वेच्या कल्याण ते सीएसएमटी या मुख्य मार्गावर आज कोणताही ब्लॉक नसल्याने येथील प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, कल्याण-कसारा मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. शहाड येथील पादचारी पूल व इतर पायाभूत सुविधेच्या कामासाठी रविवारी सकाळी १०.४५ ते दुपारी २ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. या वेळी कल्याण ते कसारा लोकलसेवा बंद असणार आहे. ब्लॉकनंतर दुपारी २ वाजून १९ मिनिटांची कल्याणहून आसनगावकडे लोकल रवाना होईल. सकाळी १०.३७ ते दुपारी १.५१ वाजेपर्यंत कल्याण ते कसारा लोकलसेवा बंद असेल. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी-कल्याण-सीएमएसटी विशेष लोकल चालविण्यात येतील. दुसरीकडे, पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी (10 फेब्रुवारी) सांताक्रुझ ते गोरेगाव या स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. तर हार्बर मार्गावर सकाळी ११ ते ४.३० पर्यंत मेगा ब्लॉक असेल.

या ब्लॉकचा फटका मनमाड, लासलगाव, निफाड येथून नाशिक, कल्याण येथे जाणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. रेल्वे रद्दमुळे ऐनवेळी नियोजित ठिकाणी जाण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे.

रद्द झालेल्या गाड्या –
गाडी क्रमांक ५११५३ मुंबई-भुसावळी पॅसेंजर.
गाडी क्र.१२०७१ दादर-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस
गाडी क्रमांक १२११७ लोकमान्य टिळक-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस.
गाडी क्र.२२१०१ मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस.
अप मार्गावरील मेल, एक्स्प्रेस
-गाडी क्रमांक ५११५४ भुसावळ-मुंबई पॅसेंजर.
-गाडी क्रमांक १२११८ मनमाड-लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेस.
-गाडी क्रमांक १२०७२ जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस.
-गाडी क्रमांक २२१०२ मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस.

याशिवाय, निळजे ते कळंबोळी या स्थानकादरम्यान दोन्ही मार्गांवर रविवारी सकाळी ९ वाजून ५० मिनिटांपासून ते ४ वाजून ५० मिनिटांपर्यंत असा ७ तासांचा पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. या पॉवर ब्लॉक दरम्यान अनेक पायाभूत कामे केली जातील. त्यानुसारच प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले.

रद्द झालेल्या गाड्या –
-गाडी क्रमांक ११०२५ भुसावळ-पुणे एक्स्प्रेस.
-गाडी क्रमांक ११०२६ पुणे-भुसावळ एक्सप्रेस.
– गाडी क्रमांक १२१२५ सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस.
– गाडी क्रमांक १२१२६ पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस.
-गाडी क्रमांक ६९१६८ वसई रोड-पनवेल मेमू.
– गाडी क्रमांक ६९१६७ पनवेल-वसई रोड मेमू.

वेळेत आणि थांब्यात बदल, (डाउन मार्ग) –
– गाडी क्रमांक १६३४५ लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस पनवेलपासून चालविण्यात येईल.
-गाडी क्रमांक ५०१०३ दादर-रत्नागिरी पॅसेंजर पनवेलपासून चालविण्यात येईल.
– गाडी क्रमांक १२६१९ लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगलोर जंक्शन मत्स्यगंधा एक्स्प्रेस रविवारी दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी रवाना होईल.

अप मार्गावरील मेल, एक्स्प्रेस-
-गाडी क्रमांक ५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर जेसीओ पनवेलपर्यंत चालविण्यात येईल.