खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर चाडय़ावर मूठ धरणारा शेतकरी पावसाने उघडीप दिल्याने पुरता हवालदिल झाला आहे. तब्बल अडीच महिन्यांपासून पावसाने दडी मारली आहे. यंदाही दुष्काळाशी सामना करण्याची वेळ आली असून शेतकऱ्यांसह शेतमजुरही दुष्काळाच्या दाहकतेत होरपळून निघाला आहे. पिकांची स्थिती बिकट आहे, हाताला काम नसल्याने रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतमजूर कामाच्या शोधात शहराकडे स्थलांतरीत होऊ लागला आहे.
जिल्ह्यात गेल्या ३ वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. कमी पर्जन्यमानामुळे शेतीचे चित्र बिकट आहे. उत्पादन कमालीची घटले. शेतामध्ये पीकच नसल्याने खुरपणी, कोळपणी, पाळी घालणे, फवारणी करणे ही कामे पूर्णपणे बंद आहेत. खुरपणीसाठी एका मजुराला साधारण दीडशे रुपये रोज मिळतो, तर पाळी घालण्यास हजार रुपये रोजगार मिळतो. फवारणी करण्यासाठी एक मजूर दिवसाकाठी तीनशे रुपये कमावतो. या वेळी मात्र शेतातील पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे खुरपण करणे, पाळी घालणे व फवारणी ही कामेच नाहीत. त्यामुळे शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. ज्या पिकांवर शेतातील मजुरी अवलंबून होती, ते पीकच पाण्याअभावी करपून गेले. त्यामुळे त्या पिकांवर फवारणी करण्याचा प्रश्नच नाही.
जूनच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या पावसावर ज्या शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली, ते पीक उगवल्यानंतर पाण्याअभावी करपून गेले. शेतमजुरांना रोजगार नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळाची वाढती दाहकता पाहता सरकारने रोजगार हमी योजनेंतर्गत, तसेच अन्य योजनांच्या माध्यमातून ग्रामस्तरावर कामे उपलब्ध केली आहेत. परंतु त्यातून योग्य मोबदला मिळत नाही. अनेक ठिकाणी योजनांची कामेच सुरू झाली नाहीत. त्यामुळे शेतमजुरांवर स्थलांतराची वेळ आली आहे. यंदाचा खरीप हंगाम जवळ-जवळ संपुष्ठात आला आहे. पावसाने दडी मारल्याने कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतीवर आधारीत कामांवरच ज्या मजुरांची गुजराण होते, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतीचे नुकसान झाल्याने हाताला कामच नाही. त्यामुळे अनेक कुटुंबाची वाताहात होऊ लागली आहे.
दिवसाकाठी तीनशे रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत रोजगार मिळवणाऱ्या शेतमजुरांपुढे कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा, हा प्रश्न पडला आहे. शेतमजुरांचे मोठय़ा संख्येने शहराकडे स्थलांतर सुरू आहे. गेवराई तालुक्यातील अनेक कुटुंबे पश्चिम महाराष्ट्रातील बागायती पट्टय़ात स्थलांतरीत होऊ लागले आहेत. आगामी काही दिवसांत पाऊस न झाल्यास शेतमजुरांचे स्थलांतर सुरूच राहणार असल्याने प्रशासनाने आतापासूनच ग्रामस्तरावर कामे उपलब्ध करावीत, अशी मागणी होत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 20, 2015 1:10 am