News Flash

पावसामुळे लाखो विटांचा माल मातीमोल

मागील दोन दिवसापासून तौक्ते चक्रीवादळामुळे कोसळणाऱ्या पावसामुळे तयार झालेला वीट माल पूर्णत: भिजून गेला आहे.

कल्पेश भोईर

वसई: मागील दोन दिवसापासून तौक्ते चक्रीवादळामुळे कोसळणाऱ्या पावसामुळे तयार झालेला वीट माल पूर्णत: भिजून गेला आहे. ऐन हंगामातच लाखोंच्या संख्येने तयार झालेल्या विटांचा माल मातीमोल झाल्याने वीट व्यावसायिकांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.

आधीच करोनाचे संकट व मागील वर्षी अधूनमधून कोसळत असलेला अवकाळी पाऊस यामुळे विटांचा व्यवसाय उशिराने सुरू झाला होता. असे असतानाही या व्यावसायिकांनी त्याला पुन्हा उभारी मिळावी यासाठी जोमाने कामाला सुरुवात करून विटा तयार करण्यास सुरुवात केली होती.

विशेषत: वसई तालुक्यातील शिरवली, कामण, पारोळ, तिल्हेर, भाताणे, नवसई, पोमण, शिवणसई, यासह वसईच्या विविध ठिकाणच्या ग्रामीण भागात वीटभट्टीचा व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात विविध ठिकाणच्या भागात बांधकामे हाती घेतली जात असल्याने या विटांना बांधकाम क्षेत्रातून मोठी मागणी असते. यामुळे वीट व्यावसायिक आधीच सर्व विटा तयार करून ठेवतात. व्यवस्थित सुकल्यानंतर त्या भट्टीत टाकल्या जातात. मात्र सोमवारपासून तौक्ते चक्रीवादळाने थैमान घातल्याने सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला आणि त्या विटांचा कच्चा माल भट्टीत जाण्याआधीच  भिजून गेला असल्याचे वीट व्यावसायिकांनी सांगितले आहे.

तयार वीट माल भिजून गेल्याने अक्षरश: त्या कच्च्या विटेची पुन्हा माती तयार झाली आहे. कोळसा, तूस हे ही वाया गेला आहे.

जिल्ह्यत वीटभट्टी मजुरांची दैना

पालघर जिल्ह्यच्या ग्रामीण भागातील अनेक मजूर आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी या वीटभट्टीवर कामाला जात असतात. यावरच या बांधवांचा उदरनिर्वाह चालतो. हे मजूर वीटभट्टीच्या ठिकाणीच आपल्या छोटय़ा झोपडय़ा बांधून राहत असतात. मात्र काल झालेल्या जोरदार पावसात त्याही झोपडय़ा भिजून गेल्याने त्यांचीही दाणादाण उडाली होती.

मागील दोन वर्षांपासून विविध मार्गाने नुकसान होत आहे. आता सर्व काही सुरळीतपणे होईल या आशेवर विटांचा व्यवसाय सुरू केला आहे. जवळपास १ लाख डब्बलच्या कच्च्या विटा तयार करून ठेवल्या होत्या तो भिजल्याने त्याची पुन्हा माती झाली आहे. यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

– नितेश भोस्कर, वीट व्यावसायिक वसई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 1:36 am

Web Title: millions of bricks destroyed due to rains ssh 93
Next Stories
1 आदिवासी भागात वादळामुळे अधिक हानी
2 कळवण तालुक्यात घरोघरी जाऊन करोनाची तपासणी
3 करोनामुक्तांसाठी ‘म्युकरमायकोसिस’ प्राणसंकट
Just Now!
X