भाजपाने शवासन करावं अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. त्यांच्या याच टीकेला उत्तर देत अतुल भातखळकर यांनी राग व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरबशा कारभारामुळे महाराष्ट्रातली स्मशाने धगधगतायत अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

भाजपाचे कांदिवली पूर्व मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर आपल्या ट्विट्समुळे कायमच चर्चेत असतात. आत्ताचं त्यांचं ट्विटही चांगलंच चर्चेत आलं आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, “मुख्यमंत्र्यांच्या घरबशा कारभारामुळे महाराष्ट्रातली स्मशाने अखंड धगधगतायत, मेंदू तल्लख करणारे आणि कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन त्यांना सुचवा. अर्थात घरी बसून करता येईल असे.”


आज सकाळीच संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजपावर जोरदार टीका केली आहे. यावेळी शिवसेना नेत्यांवर दबाव टाकून सत्तास्थापनेसाठी भाग पाडण्याचा प्रयत्न आहे का ? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “त्याला यश मिळेल असं वाटत नाही. आम्ही वाघाच्या काळजाची माणसं आहोत. आमचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं यात मोडत नाही. आम्ही कोणत्याही प्रसंगाला तोंड देणारे बाळासाहेबांचे शिलेदार आहोत”.

“शिवसेनेसोबत काम करता करता केस पांढरे झाले आहेत आणि परत काळे करत आहोत. आम्हाला सर्व माहिती असून फार तर तुरुंगात टाकाल. तुरुंगात जाण्याची आमची तयारी आहे. आम्ही महाभारताची जी उदाहरणं जी दिली आहेत त्यातील योद्धे आम्हीच आहोत. आणि माझं नाव संजय आहे”.

संजय राऊतांना यावेळी योग दिनाच्या निमित्ताने कोणतं आसन सुचवाल असं विचारलं असता शवासन असा टोला त्यांनी लगावला.