मुंबई महापालिकेतील फोडाफोडीच्या राजकारणावरुन तक्रार करणाऱ्या भाजपवर शिवसेनेने पलटवार केला आहे. बक्कळ पैशांवर फुटकळ राजकारण करणाऱ्यांना शिवसेनेचा काटा टोचत असून त्यांनी सेनेवर कितीही तीर सोडले तरी ते त्यांच्यावरच उलटतील, अशा शब्दात शिवसेनेने भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सात पैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला असून शिवसेनेने पाच कोटी रुपये देऊन नगरसेवक फोडले, असा आरोप मनसे आणि भाजपने केला. दोन्ही पक्षांनी याप्रकरणी तक्रार देखील दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ च्या अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आले. शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी, महाराष्ट्रवादी पक्षाचा काटा भाजपला सलत असून सेनेला बदनाम करण्यासाठीच ते तीर सोडत असले तरी ते त्यांच्यावर उलटतील. शिवसेनेचे बळ वाढल्याचे दुःख काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना झाले नाही, पण बक्कळ पैसेवाल्यांना ते झाले, असे सांगत सेनेने भाजपला चिमटा काढला. आमच्याविरोधात तक्रारी केल्या तरी मुंबईवर मराठी अस्मितेचा भगवा झेंडा फडकतच राहणार, असेही अग्रलेखात म्हटले आहे.

राजकारण साधूसंतांचे राहिले नसून एकमेकांवर पाय देऊनच राजकारणात टिकाव धरावा लागतो. पण शिवसेनेने इतक्या खालच्या पातळीवर राजकारण केलेले नाही असेही अग्रलेखातून स्पष्ट करण्यात आले. मनसेचे नगरसेवक भाजपतील महाराष्ट्रद्रोह्यांविरोधात शिवसेनेच्या झेंड्याखाली एकवटले असून हे फोडाफोडीचे राजकारण नाही, असा दावा शिवसेनेने केला आहे. पैशांसाठी नगरसेवक शिवसेनेत आल्याचा आरोप म्हणजे मराठी अस्मितेचा अपमान असल्याचे सेनेने म्हटले आहे. सध्या राजकारणात एकाच पक्षाकडे पैसा असून त्याच पैशांचा वापर करुन शिवसेनेचे पाय खेचण्याचे प्रयत्न सुरु असून याविरोधात एकही भामटा ‘ईडी’कडे तक्रार करत नाही, याकडेही शिवसेनेने लक्ष वेधले.