राज्यात आता करोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादसह सर्वच शहरांमध्ये मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी, आमदार, खासदरांसह अगदी मंत्र्यांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात अडकत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांना देखील करोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच, जिल्हासंघटक हे देखील करोना पॉझिटिव्ह आढळल्याचे समोर आले आहे.

”गेले वर्षभर करोनासोबत लपंडाव खेळत होतो, पण तुर्तास करोनाच्या तावडीत सापडलोच ! गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, आवश्यक वाटल्यास चाचणी करावी. करोना बरा होतो. लवकरच कोरोनावर मात करून पुन्हा जोमाने कामाला लागेन.”  असं ट्विट करत राजू पाटील यांनी माहिती दिली आहे.

आज दिवसभरात कल्याण – डोंबिवली महापालिका क्षेत्रात आढळून आलेल्या करोनाबाधितांची एकूण संख्या ९८७ होती. तर, उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या ६ हजार ६७१, करोनातून बरे झालेल्यंची संख्या ६५ हजार ९३१ आहे. याशिवाय आज डिस्चार्ज झालेल्यांची संख्या २४१ असून, चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

कल्याण पूर्व – १५५, कल्याण पश्चिम – ३३०, डोंबिवली पूर्व – ३१६, डोंबिवली पश्चिम – ११०, मांडा टिटवाळा – ५७, मोहना -१७, पिसवली – २ अशी रूग्णांची विगतवारी आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.