सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने ई-ऑफिसपाठोपाठ मोबाइल ऑफिस प्रणाली कार्यान्वित करून सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाला भारतातील पहिला मान मिळवून दिला आहे. मोबाइल ऑफिस प्रणाली, महसूल कार्यपद्धती पुनर्रचना (बी.पी.आर.) प्रणाली सुरू करून सिंधुदुर्गला गतिमान प्रशासन दिले असल्याचे शुभारंभप्रसंगी मान्यवरांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्हा महसूल यंत्रणेने डिसेंबरमध्ये ई-ऑफिस प्रणाली सुरू केली. आता मोबाइल ऑफिस प्रणालीचा शुभारंभ पालकमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया, विभागीय आयुक्त विजय नाहटा, यशदा महासंचालक संजय चहादे, जिल्हा परिषद अध्यक्ष  निकिता परब, माहिती तंत्रज्ञान  सचिव राजेश अगरवाल, जिल्हाधिकारी विरेंद्र सिंह, पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे व मुख्य कार्यकारी अधिकारी ई. रवींद्रन आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाला ई-ऑफिस, मोबाइल ऑफिस प्रणाली सुरू करून देशात नेण्याचे काम प्रशासनाने केले आहे. हे काम करताना जिल्ह्य़ातून दारिद्रय़, कुपोषण, निरक्षरता दूर करण्यासाठी प्रशासनाने झटावे, तसेच दरडोई उत्पन्न वाढवून रोजगाराभिमुख उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री नारायण राणे यांनी केले. जिल्हाधिकारी विरेंद्र सिंह यांनी संपर्क व्यवस्थेतून व्हिडीओ कॉन्फरन्सिग लिंक सेवा, बिझनेस प्रोसेस रिइंजिनीयरिंग (बीपीआर) या प्रणालीचा शुभारंभ व यशदा पुणेकडून करण्यात आलेल्या पुस्तिकेच्या प्रकाशनाची माहिती या वेळी दिली. सिंधुदुर्ग जिल्हा सर्वच क्षेत्रांत आघाडी घेत आहे. ई ऑफिसची ओळख करून घेण्यासाठी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना मुभा दिली आहे. मंत्रालयात आग लागल्यानंतर ई ऑफिस प्रणाली सुरू करण्याची आवश्यकता सर्व सचिवांसमोर मांडली आहे, असे राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया म्हणाले. राज्यातील ग्रामीण भागात बायोमॅट्रिक प्रणाली झाल्यास अधिकारी तेथे पोहोचला किंवा नाही हे कळेल. म्हणून या योजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून शेतकऱ्यांच्या पिकाची पीक पाहाणी करण्यासाठी शेतकऱ्यांना खास योजना आणण्याचा विचार जयंतकुमार बांठिया यांनी व्यक्त केला. या वेळी मोबाइल प्रणालीबाबत माहिती देण्यात आली.