परभणी : शेतकऱ्यांचे कोटय़वधी रुपये लुटणाऱ्या रिलायन्स कंपनीवर कारवाई करण्याऐवजी तांत्रिक मुद्दे काढून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.  रिलायन्स कंपनीला शासन एवढे पाठीशी का घालीत आहे? येत्या आठ दिवसांत परभणीतील पीकविमा प्रश्नी शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास अंबानींच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला. आज सत्ताधारी देश कॉर्पोरेट कंपन्यांकडे गहाण ठेवत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यतील शेतकऱ्यांनी रिलायन्स पीकविमा कंपनीविरुद्ध १३ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. रविवारी (८ जुलै) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. या वेळी खासदार शेट्टी म्हणाले, कृषी आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या साहाय्याने शेतकऱ्यांकडून विम्यापोटी कोटय़वधी रुपये जमा करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांना विमा परतावा न देणाऱ्या अनिल अंबानी यांनी शेतकऱ्यांच्या पशांवर दरोडा घातला असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.

देशभरातून ९ हजार ४१ कोटी रुपये रिलायन्स कंपनीने विम्यापोटी जमा केले. परतावा मात्र केवळ ८१२ कोटी रुपयांचाच दिला आहे, त्यामुळे ही पीकविमा योजना अंबानी कल्याण योजना असल्याचे शेट्टी म्हणाले. या वेळी कॉ. राजन क्षीरसागर, ज़ि.प सदस्य श्रीनिवास जोगदंड, स्वाभिमानी संघटनेचे माणिक कदम, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे आदींची उपस्थिती होती.