News Flash

वीजसंकट कायम

सोमवारी झालेल्या चक्रीवादळाच्या पाश्र्वभूमीवर महावितरणच्या पालघर विभागाची व्यवस्था पार कोलमडली आहे.

महावितरणची व्यवस्था कोलमडली; निम्म्या जिल्ह्य़ातील पुरवठा खंडित

पालघर : सोमवारी झालेल्या चक्रीवादळाच्या पाश्र्वभूमीवर महावितरणच्या पालघर विभागाची व्यवस्था पार कोलमडली आहे. जिल्ह्यतील अनेक भागांत सलग तिसऱ्या दिवशी विद्युतपुरवठा खंडित राहिला होता. पालघर व बोईसर शहरांतील अधिकतर भागात वीज नव्हती. वीज नसल्याने पाणीपुरवठय़ावरही परिणाम झाला. नागरिकांना पिण्याचे पाणी नसल्याने मोठय़ा गैरसोयीला सामोरे जावे लागले.

वादळी वाऱ्यामुळे काही भागांत रविवारी सायंकाळपासून तर उर्वरित भागात सोमवारपासून खंडित झालेला वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे काम महावितरणने हाती घेतले आहे. तुटलेल्या झाडांच्या फांद्या, विद्युतवाहिनीवर झुकलेली झाडे तोडून काढण्यासाठी महावितरणकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विद्युतपुरवठा पूर्ववत करण्यात अडथळे येत आहेत. शहरी भागात झाडांची संख्या कमी असली तरीही मनुष्यबळाचा तुटवडा येथेही जाणवत आहे.

करोना रुग्णालय व पाणीपुरवठा करणाऱ्या फिडरचा विद्युतपुरवठा सुरू करण्यास अग्रक्रम असल्याने इतर भाग दुर्लक्षित राहिला. विशेष म्हणजे पालघर, बोईसर शहरांमधील काही भागांत विद्युतपुरवठा मंगळवारी सायंकाळी पूर्ववत झाला. या दोन्ही शहरांतील अनेक भागांमध्ये बुधवार दुपापर्यंत वीजपुरवठा सुरू झाला नसताना शासकीय व महावितरण अधिकारी व राजकीय मंडळी राहत असलेल्या इमारतींमध्ये वीजपुरवठा सुरू होता. त्याबाबत नागरिकांचा संताप खदखदत होता.  विशेष म्हणजे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे (एनडीआरएफ) पथक उपलब्ध असताना त्यांची मदत घेण्यात आली नसल्याचे दिसून आले. तसेच विद्युतवाहिनी सुरू करण्याचा अग्रक्रम ठरवताना स्थानिक प्रशासनाला विश्वासात न घेतल्याने शहरी भागातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले.

समन्वयाचा अभाव

महावितरणकडून वीजपुरवठा नेमका कधी पूर्ववत होईल याचा अंदाज दिला जात नसल्याने जिल्हा आपत्कालीन व्यवस्थेने बाधित होणाऱ्या भागात पिण्याचे पाणी किंवा इतर वापरासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची कोणतीही योजना तयार केली नव्हती. शासकीय व्यवस्थेमधील समन्वयाचा अभाव चक्रीवादळाच्या अनुषंगाने प्रकर्षांने दिसून आला. बुधवार दुपापर्यंत अनेक भागांमध्ये विद्युतपुरवठा पूर्ववत न झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तसेच इतर गृहोपयोगी व प्रातर्विधीसाठी पाण्याची तीव्र टंचाई भासत होती. असे असताना जिल्हा प्रशासनाने या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केली नाही.

काळजी केंद्रांमध्ये वीज-पाणी नाही

जिल्हा प्रशासनाने २० समर्पित करोना रुग्णालयांमध्ये विद्युतपुरवठा सुरू करण्यासाठी अग्रक्रम देण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्यामध्ये करोना काळजी केंद्र व काही खासगी करोना उपचार रुग्णालयांची नावे नसल्याने अशा केंद्रांमध्ये वीज व पाणीपुरवठय़ाचा प्रश्न गंभीर झाला होता. पालघर नगर परिषदेच्या पूनम पार्क येथील करोना काळजी केंद्रात काही गंभीर रुग्णांसाठी उपचार यंत्रणा चालविण्यासाठी जनित्राचा (डिझेल जनरेटर) वापर करण्यात आला. तर इतर रुग्णांना मेणबत्त्यांच्या प्रकाशात दोन रात्री काढाव्या लागल्या. या केंद्रामध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालघर अग्निशमन दलाची मदत घ्यावी लागली.

इतर रुग्णालयांसमोर संकट

बिगरकरोना रुग्णालयांमध्ये देखील अनेक गंभीर रुग्ण दाखल असताना त्या ठिकाणी जनित्राच्या मदतीने काही विभागांमध्ये वीजपुरवठा सुरू होता. सलग जनरेटर किती वेळ सुरू ठेवावा व त्यामध्ये बिघाड झाल्यास काय करायचे, अशी समस्या खासगी रुग्णालयांसमोर निर्माण झाली होती.

कासा परिसरात ६८ तासांपासून वीजपुरवठा खंडित

कासा : चक्रीवादळामुळे कासा परिसरातील विजेचे अनेक खांब तुटून पडले आहेत. तसेच अनेक ठिकाणी   झाडे पडून विजेच्या तारा तुटून पडल्या आहेत. परिसरात गेल्या ६८ तासांपासून वीजपुरवठा खंडित आहे. कासा परिसर कूपनलिकेमार्फत मिळणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहे. वीजपुरवठा खंडित असल्याने कूपनलिकांमधून पाणी काढता येत नाही, तसेच खासगी पाणी विक्रेत्यांचे प्लांट विजेअभावी बंद असल्याने तेथूनही पाणी मिळत नाही. कासा परिसरात दोन ते तीन ठिकाणीच हातपंप आहेत. वीज नसल्याने या सर्व हातपंपांवर नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे करोना संसर्गाचा धोका आहे.

वीज नसल्याने जनजीवन विस्कळीत

पालघर तालुक्यात  सफाळे, केळवे, एडवण, रामबाग व मनोर या पाच उपकेंद्रांतर्गत असणाऱ्या अनेक गावांमध्ये ६० तासांपासून वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.  विशेष म्हणजे महावितरणकडून वीज प्रवाह पूर्ववत होण्याबाबत कोणतीही सूचना  देण्यात आल्या नसल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

१०७५ विद्युत खांब कोसळले

चक्रीवादळामुळे पालघर महावितरण विभागात ५२५ तर वसई विभागात ५५० असे १०७५ खांब कोसळल्याची माहिती महावितरणने येथील जिल्हा प्रशासनाला दिली आहे. पालघर विभागांतर्गत ८१५ गावांचा विद्युतपुरवठा खंडित झाला होता त्यापैकी बुधवार सकाळपर्यंत ४२१ गावांचा वीजपुरवठा सुरळीत केल्याचा दावा महावितरणने केला आहे. वसई महावितरण विभागांतर्गत खंडित झालेल्या ९४ गावांच्या विद्युतपुरवठय़ापैकी ६१ गावांचा वीजपुरवठा सुरळीत केल्याचे महावितरणने कळवले आहे.

चक्रीवादळामुळे सोमवारपासून  पालघर नगर परिषद क्षेत्रातील पूनमपार्क ह्य करोना काळजी केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाल्याने जनित्राच्या साह्य़ाने तो सुरू करण्यात आला. त्यामुळे करोना रुग्णांचे उपचार करणे शक्य होत आहे.  वीजपुरवठा नसल्याने इमारतीच्या टाक्यांमध्ये पाणी चढत नव्हते. अखेर नगर परिषद अग्निशमन दलाच्या सहकार्याने  स्वच्छतागृह, स्नानगृहासाठी लागणाऱ्या पाण्याची सोय करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 3:03 am

Web Title: msedcl system collapses supply disrupted in half the district ssh 93
Next Stories
1 चक्रीवादळात वसईची वाताहत
2 ग्रामीण भागांत पंचनाम्याचे काम सुरू
3 वसई-विरारमधील मिठागरे पाण्यात
Just Now!
X