13 August 2020

News Flash

नाशिकमध्ये कांदादरात दोन हजारांनी घसरण

उन्हाळ कांदा संपुष्टात आला असताना नवा कांदा बाजारात फारसा आला नाही.

सोलापुरातही आवक वाढल्याने भाव कोसळले

तूटवडय़ामुळे काही दिवसांत दराचे नवनवीन उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या कांद्याची आवक वाढू लागल्यानंतर आता घसरण सुरू झाली आहे. सोमवारी दर दोन हजार रुपयांनी खाली आले. शुक्रवारी नव्या लाल कांद्यास क्विंटलला सरासरी ६८०० रुपये मिळालेले दर सोमवारी ४७०१ रुपयांवर आले. साठवणुकीवरील नवीन निर्बंध आणि परदेशातील कांदा येण्याच्या मार्गावर असल्याचा प्रभाव दरावर पडल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

अवकाळी पावसाने काढणीवर आलेल्या खरीप कांद्याचे अतोनात नुकसान झाले. त्याची परिणती ऑक्टोबरमध्ये तूटवडा निर्माण होऊन दर वधारण्यात झाली. उन्हाळ कांदा संपुष्टात आला असताना नवा कांदा बाजारात फारसा आला नाही. कांदा बाजारातील घटलेली आवक हळूहळू उंचावत आहे. लासलगाव बाजार समितीत सोमवारी ९८०० क्विंटलची आवक झाली. शुक्रवारच्या तुलनेत ती चार हजार क्विंटलने वाढली. इतर बाजार समित्यांमध्ये ही स्थिती आहे. आवक वाढल्याने दर कमी झाले. सोमवारी या बाजारात किमान दोन हजार ते कमाल ६८०० आणि सरासरी ४७०१ रुपये दर मिळाले. शुक्रवारी ते कमाल २५०० ते कमाल १००६४ आणि सरासरी ६८०० रुपये होते. दर कमी होण्यामागे तीन कारणे मुखत्वे असल्याचे लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी सांगितले. उशिराच्या खरीपचा कांदा बाजारात येऊ लागला आहे. त्याचे प्रमाण पुढील काळात वाढत गेल्यास दरावर त्याचा परिणाम होणार आहे. शिवाय, कांद्याच्या साठवणुकीवर केंद्र सरकारने नवीन निर्बंध घातले. त्यानुसार घाऊक व्यापारी आता केवळ २५ मेट्रीक टन तर किरकोळ व्यापाऱ्याला पाच मेट्रीक टन कांदा साठवणूक करता येईल. त्याचा प्रभाव दरावर पडला. तुटवडय़ामुळे सरकारने परदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. हा कांदा बाजारात दाखल होत असून या सर्वाचा एकत्रित परिणाम दरावर होत असल्याचे जगताप यांनी सांगितले.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक दर मिळत असल्याची माहिती पसरल्यानंतर राज्यासह  दूरदूरच्या भागातून कांद्याची आवक वाढू लागली आहे. त्यामुळे कांद्याचा उच्चांकी दर कोसळून ११ हजार ५०० रुपयांपर्यंत खाली आला, तर स्थिर दरातही घट होऊन प्रतिक्विंटल तीन हजार रुपये दर मिळाला. सोमवारी ३५ हजार १९६ क्विंटल कांद्याची आवक होऊन एकूण दहा कोटी ५५ लाख ८८ हजारांची उलाढाल झाली. गेल्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याचे उत्पादन घटले आणि शेती बाजारात कांद्याची आवकही रोडावत गेली होती. सोलापुरात मात्र नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून कांद्याला चांगला दर मिळू  लागल्याने शेतकऱ्यांचे लक्ष सोलापूरकडे वळले आणि जुन्या साठवण केलेल्या कांद्याची आवक होऊ लागली. देशात सर्वाधिक २० हजार रुपये दर मिळाल्यानंतर सोलापूरच्या शेती बाजाराची ख्याती देशभर पसरली. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटकासह दिल्ली, तेलंगणा, आंध्र व तामिळनाडू आदी दूरदूरच्या भागातून कांद्याची आवक वाढत  गेली. त्याचा परिणाम कांदा दरावर झाला. गेल्या शनिवारी कांद्याचा उच्चांकी दर २० हजारांवरून १७ हजारांपर्यंत खाली आला. त्यानंतर काल रविवारी सुट्टीच्या दिवशीही त्यात आणखी घट होऊन दहा हजारांइतका उच्चांकी दर मिळाला. तर स्थिर दरातही ६५०० रुपयांवरून घसरण होत गेली. ंसोमवारी कांदा दरात आणखी घसरण होऊन उच्चांकी दर ११ हजार ५०० रुपये, स्थिर दर तीन हजार रुपयांपर्यंत मिळाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2019 1:38 am

Web Title: nahsik onion rate low rate down akp 94
Next Stories
1 ‘प्रश्नचिन्ह’ आश्रमशाळा उद्ध्वस्त; मात्र संस्थाचालकांनाच दंड
2 ग्रामविकास रखडणार
3 फडणवीस-अजित पवार एकत्र येतात तेव्हा..
Just Now!
X