दलालांचे खिसे भरण्यासाठी शासन रिफायनरी प्रकल्प पुन्हा आणण्याचा प्रयत्न करत असेल शिवसेना शांत बसणार नाही, अशी ग्वाही सेनेचे कोकणातील खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

राजापूर तालुक्यातील तारळ येथे खासदार राऊत यांच्या उपस्थितीत प्रकल्पविरोधकांची बैठक पार पडली. यावेळी खासदार राऊत म्हणाले की, भाजपा सरकार कोकणातील सिंचन प्रकल्पांना निधी देत नाही. काजू, नारळ पिकांना भाव देत नाही. मत्स्य दुष्काळ जाहीर करत नाही. कोकण विकासासाठी कोणत्याही योजना मंजूर करत नाही. मात्र कोकणची राखरांगोळी करणारा रिफायनरी पकल्प आणण्यासाठी पुढाकार घेत आहे, ही बाब दुर्दैवी आहे.

नियोजित प्रकल्पामध्ये अन्य प्रांतीय  लोकांना मिळणार आहेत. आणि येथील तरूण तसाच बेरोजगार राहणार असल्याचे स्पष्ट करून, प्रकल्पाला असलेला विरोध पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रकल्पग्रस्त गावातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ठराव करून ते शासनाकडे पाठवा, असेही खासदार राऊत यांनी सांगितले.

या विषयावर शिवसेना प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी असल्याचे आमदार राजन साळवी यांनी जाहीर केले.

आमदार साळवी यांच्यासह जिल्हा प्रमुख विलास चाळके, संपर्क प्रमुख दिनेश जैतापकर, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर इत्यादी बठकीला उपस्थित होते.