महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना पुणे न्यायालयाने ४ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. संजीव पुनाळेकर यांच्याकडून मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले असून त्याची तपासणी सुरु असल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपींकडून बाजू मांडणारे अ‍ॅड. पुनाळेकर आणि त्यांच्याकडे कामाला असलेला लिपिक भावे याला सीबीआयने अटक केली आहे. शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना १ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली होती. आज (शनिवारी) सीबीआय कोठडीची मुदत संपल्याने दोघांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायाधीश रेटटे यांनी पुनाळेकर आणि भावे यांना ४ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी आणि बचाव पक्षाचे वकील म्हणून सुभाष झा यांनी काम पाहिले.

न्यायालयात युक्तिवाद करताना प्रकाश सूर्यवंशी म्हणाले की, संजीव पुनाळेकर यांच्याकडून मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. त्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. तसेच बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए)कायद्यानुसार तपास करण्यात येत आहे. त्यामुळे पुनाळेकर आणि भावे यांच्या चौकशीसाठी १४ दिवसांची सीबीआय कोठडीची मागणी करण्यात आली.  तर बचाव पक्षाच्या वतीने सीबीआयच्या मागणीला विरोध करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने दोघांना ४ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली.