News Flash

महाराष्ट्रात ‘निपाह व्हायरस’चा शिरकाव; महाबळेश्वरमध्ये वटवाघुळांमध्ये आढळले विषाणू

मार्च २०२० मध्ये महाबळेश्वरमधील एका गुहेत हे वटवाघूळ सापडले होते

महाराष्ट्रात निपाह व्हायरसची धडक (फोटो - प्रातिनिधिक)

करोना संकटाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्राची चिंता वाढवणारी माहिती समोर आली असून राज्यात वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळला आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली असून महाराष्ट्रात प्रथमच निपाह विषाणू आढळला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मार्च २०२० मध्ये महाबळेश्वरमधील एका गुहेत हे वटवाघूळ सापडले होते. शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रजातींच्या वटवाघुळांचे नमुने घेत संशोधन केलं होतं.

दरम्यान या अभ्यासाचे प्रमुख असणारे डॉक्टर प्रज्ञा यादव यांनी याआधी महाराष्ट्रात वटवाघुळाच्या कोणत्याही प्रजातीत निपाहचे विषाणू आढळले नव्हते अशी माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने रोगांच्या यादीत पहिल्या १० मध्ये निपाह व्हायरसला ठेवलं असून हा खासकरुन वघटवाघुळांमध्येच आढळतो. माणसांपर्यंत हा विषाणू पोहोचल्यास मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याची शक्यता असते. २०१८ मध्ये केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे मृत्यूतांडव झाला होता.

एनआयव्हीने नुकताच अभ्यासात समोर आलेली माहिती प्रसिद्ध केली आहे. यानुसार भारतात आतापर्यंत चार वेळा निपाह व्हायरस समोर आला आहे. निपाह व्हायसरवर कोणतंही औषध किंवा लस नसून तो सर्वात धोकादायक मानला जातो. यामध्ये मृत्यूदरही खूप आहे. अनेक राज्यांमध्ये करोनाचा मृत्यूदर एक ते दोन टक्के असून निपाह व्हायरसमध्ये मृत्यूदर हा ६५ ते १०० टक्के इतका आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये वटवाघुळांमुळे इबोलासारखे गंभीर व्हायरस समोर आले होते ज्यामुळे आरोग्यव्यवस्था कोलमडली होती. करोनाच्या उद्रेकामागेदेखील वटवाघूळ असल्याचाच दावा आहे.

२०१८ मध्ये केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे थैमान घातलं होतं. याआधी भारतात २००१ मध्ये पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये निपाह व्हायरस आढळला होता. तसंच आसाममध्येही निपाहचे रुग्ण आढळून आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 10:43 am

Web Title: nipah virus found in two bat species in mahabaleshwar maharashtra by niv team sgy 87
Next Stories
1 “आम्ही शिवसेनेची विचारसरणी सहन करु शकतो, पण…,” पृथ्वीराज चव्हाणांनी मांडलं परखड मत
2 “…त्यात चुकीचं काय?,” काँग्रेसचा मुख्यमंत्री करण्यावरुन पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान
3 ‘शोले’चा रिमेक करण्याचा विचार आहे म्हणे…; शरद पवार, संजय राऊतांवर भातखळकरांनी साधला निशाणा
Just Now!
X