निसर्ग चक्रीवादळानंतर केंद्र सरकारकडून राज्याला एका रुपयाचीही मदत आलेली नाही. वादळग्रस्तांना दिली जात असलेली सर्व रक्कम ही राज्यसरकारने उपलब्ध करून दिली आहे. पश्चिम बंगाल आणि ओदिशामधील वादळानंतर केंद्र सरकारने राज्यसरकारच्या मागणी आधीच निधी देण्याची घोषणा केली होती. मात्र महाराष्ट्राला तशी मदत मिळाली नाही असा आरोप खासदार सुनील तटकरे यांनी केला. असे असले तरी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एकही व्यक्ती शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी आम्ही घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी खासदार तटकरे म्हणाले,  निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा रायगड जिल्ह्याला बसला. यामुळे जनजीवन उध्वस्तच झाले. मुख्यंमत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी परिस्थितीची पहाणी केली आहे, यानंतर राज्यसरकारने वादळग्रस्तांसाठी ३०० कोटींहून अधिकचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सध्या मदत वाटपाचे काम सुरु आहे. आत्ता पर्यंत ७७ कोटी ५० लाख रुपयांची मदत वाटप करण्यात आली आहे. अंशतः बाधित झालेल्या घरांसाठी वाढीव मदत देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. घरांच्या नुकसानीच्या प्रमाणात आता आपदग्रस्तांना मदत दिली जाणार आहे. मच्छिमारांना बोटीचे नुकसान झाले, तर पुर्वी ९ हजार रुपये दिले जायचे आता त्यांना २५ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. फळबागांच्या नुकसानीसाठी हेक्टरी ५० हजार रुपये दिली जाणार आहे. यात अजून वाढ व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

फळबाग लागवड योजनेचे पुर्नउज्जीवन झाले आहे. यात नारळ, सुपारी आणि कोकम यांचाही समावेश असणार आहे. आर्थिक परिस्थिती कठीण असली तरी राज्यसरकार आपदग्रस्तांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहील, कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही. पंचनाम्याबाबत कोणाची तक्रार असेल तर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

खासगी शाळांचे वादळात मोठे नुकसान झाले आहे. या शाळांना २ लाखांपर्यंतची मदत देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. याशिवाय राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून २५० शाळांना किमान १०० पत्र्यांचे वितरण केल जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

 सागरी महामार्ग २ वर्षात पुर्ण करणार-
बॅरीस्टर ए आऱ अंतुले यांनी पाहीलेले रेवस रेड्डी महामार्गाचे स्वप्न पुढील दोन वर्षात पुर्ण करणार असल्याचे सागंत, या प्रकल्पाचा डीपीआर बनविण्याचे काम सुरु झाले, असे ते म्हणाले. डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष रस्त्याचे काम सुरु करण्याचा आमचा प्रयत्न राहिल. हे काम दोन वर्षात पुर्ण केले जाईल. यामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.