देवगड येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या तीन रुग्णांना स्नायुदुखीचे इंजेक्शन दिल्याने त्याचे रिअ‍ॅक्शन होऊन कावलेवाडी येथील रिक्षाचालक संदीप पांडुरंग कावले (४५) याचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे अत्यवस्थ बनल्याने देवगडमध्ये ग्रामस्थांत संतापाची लाट पसरली. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी शनिवारी आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी कुटुंबीय व ग्रामस्थांची भेट घेऊन या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल असे स्पष्ट केले. देवगड ग्रामीण रुग्णालयात शनिवारी ओपीडी सुरू झाल्यावर देवगड कावलेवाडी येथील रिक्षाचालक संदीप पांडुरंग कावले (४५) हे अंग दुखत असल्याने तपासणीकरिता आले. त्यांनी केस पेपर घेऊन डॉ. अमरीश आगाशे यांच्याकडून तपासणी करून घेतली. यावेळी परिचारिका जाधव यांनी त्यांना इंजेक्शन दिले. ग्रामीण रुग्णालयातून इंजेक्शन घेऊन बाहेर पडताच रुग्णालयाच्या आवारात रिक्षा उभी होती तेथे जात असताना अस्वस्थ वाटू लागले. ते रिक्षात बसले व तळमळू लागले. दरम्यान अन्य रुग्णांनी त्यांना रुग्णालयात पुन्हा नेले, उपचार सुरूच असताना त्यांचे निधन झाले. यावेळी अन्य दोन रुग्ण मीठमुंबरी येथील नारायण हरी वाघाट (४२) व गुणाबाई बाजीराव जाधव (६९) यांनाही तेच इंजेक्शन दिल्याने त्रास जाणवू लागला. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णांना इंजेक्शनचे रिअ‍ॅक्शन होऊनही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे जमलेल्या लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांना पाचारण करण्यात आले. त्यांनीही येण्यास उशीर लावल्याने जमलेल्या जनतेने प्रचंड नाराजी व्यक्त करत रुग्णालयासमोर रास्ता रोकोदेखील केला. यावेळी मृत संदीप कावले यांच्या पत्नीला आरोग्य खात्याच्या भरतीच्या वेळी प्राधान्याने संधी देण्यात येईल, असे आश्वासन खासदार विनायक राऊत व आम. वैभव नाईक यांनी दिले. त्यांनी तातडीची मदत म्हणून पत्नीकडे रोख एक लाख रुपये दिले. देवगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमरीश आगाशे यांचे निलंबन व्हावे म्हणून प्रयत्न करण्याची ग्वाही आमदार नाईक यांनी दिली.