महाविकासआघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांचा सोमवारपर्यंत राजीनामा घ्यावा. अन्यथा या प्रकरणी तोंड न उघडणाऱ्या सरकारला विधिमंडळात तोंड उघडू देणार नाही. अर्थसंकल्पीय कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. याबाबत अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवेदन केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पूजा चव्हाण प्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचे पडसाद विधिमंडळ सभागृहाच्या कामकाजात अधिक उमटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत बोलताना चंद्रकांत आमदार पाटील म्हणाले, संजय राठोड यांच्यावर कारवाई का केली जात नाही? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्वतःला सत्यवादी समजणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार याप्रकरणी गप्प का बसले आहेत? तसेच, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे विधानपरिषदेचे उपसभापती, शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे यांनी बोलले पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली.

संजय राठोड प्रकरणी भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ या वाघिणी प्रमाणे आक्रमक झाल्या असताना, त्यांच्या पतीवर गुन्हे दाखल करण्याचे काम राज्यशासन करत आहे. हा दडपशाहीचा कारभार भाजपा खपून घेणार नाही, असेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

याचबरोबर, आगामी अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी, प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान, वीज बिल माफी, करोना महामारी काळातील वैद्यकीय साहित्य खरेदीतील प्रचंड भ्रष्टाचार, मराठा समाज आरक्षण आदी प्रश्न आक्रमकपणे मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.