‘परळी विधानसभा मतदारसंघातून कोणीही निवडणूक लढवावी. शिवसेना ही निवडणूक लढणार असेल तर मी त्याचे स्वागतच करते,’ अशा शब्दांत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शिवसेनेचे आव्हान स्वीकारले आहे. तीन वर्षांत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मिळवलेला विजय आणि शिवसेनेची उमेदवार देण्याची घोषणा, यामुळे पंकजा यांच्यासमोरच आव्हान निर्माण होईल, असे मानले जाते आहे.

बीड लोकसभेसह परळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना ही भाजप उमेदवाराविरोधात निवडणूक लढवणार असल्याचे पक्षनिरीक्षक आमदार सुभाष साबणे यांनी गुरुवारी बैठकीत जाहीर केले. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत डॉ. प्रीतम मुंडे व परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे या मुंडे भगिनींविरोधात शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा उमेदवार दिला नव्हता. परिणामी, खासदार प्रीतम मुंडे देशात विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या, तर पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांचा २५ हजारांच्या फरकाने पराभव केला. सत्तांतरानंतर पंकजा यांना पालकमंत्रिपदासह प्रमुख खात्यांच्या मंत्रिपदाची संधी मिळाली. जिल्ह्यतील सर्व संस्थांची सत्ता ही पंकजा यांच्याकडे आहे, मात्र सत्तेच्या तीन वर्षांत शिवसनिकांना कायम दुजाभावाची वागणूक मिळाली. जिल्हास्तरावरील सेना पदाधिकारी जाहीरपणे मुंडे भगिनींकडून शिवसनिकांना सन्मान मिळत नसल्याचा आरोप करत. वरिष्ठ पातळीवर तक्रारी गेल्या. दरम्यान, शिवसेनेचे आगामी निवडणुकांत २८८ मतदारसंघांत भाजप विरोधात निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. मातोश्रीवरूनच मुंडे भगिनींविरुद्ध निवडणूक लढवण्याचा आदेश असल्याचे साबणे यांनी स्पष्ट केले आहे. तर परळी मतदारसंघात मागील काही वर्षांत झालेल्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ निवडणुकीत राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एकहाती विजय मिळवून आपलेही वर्चस्व दाखवले आहे.

भाजपला मतविभाजनामुळे फटका

या पाश्र्वभूमीवर शिवसेनेचा उमेदवार भाजपच्याच मतांत जास्त फाटाफूट करेल आणि याचा धनंजय यांना फायदा होईल, असे मानले जाते आहे. मागच्या वेळी सर्वत्र भाजपच्या लाटेत इतर आमदार ५० हजारपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले. पण परळीत २५ हजारांचाच फरक राहिला. तीन वर्षांत सत्तेच्या डामडौलात पुलाखालून बरेच पाणी वाहिले आहे. त्यामुळे पंकजा यांनी सेनेचे आव्हान स्वीकारले असले तरी भाजपला मतांची फाटाफूट रोखण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीतही सेनेच्या उमेदवारीचा भाजपलाच फटका सहन करावा लागणार आहे.