‘महाराष्ट्रात सर्कस आहे. त्यामध्ये प्राणी आहेत. फक्त विदुषक नाही. असे म्हणत शरद पवार यांनी महाराष्ट्रात सर्कस सुरू असल्याचे मान्य केले आहे,’ असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आज (बुधवार) कोल्हापुरात लगावला.

आपल्या  ६० व्या वाढदिवसानिमित्त आमदार  चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर शहरामध्ये करोना संसर्ग टाळण्यासाठी आरोग्यविषयक साहित्याचे विविध ठिकाणी वाटप  केले. राजारामपुरी येथील कार्यक्रम संपल्यानंतर पाटील यांनी शरद पवार यांच्या विधानावरून त्यांच्यावर व राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर निशाना साधला.

निसर्ग वादळामुळे कोकणात निर्माण झालेल्या आपत्ती वरून राजकीय टीका-टिपणी सुरू आहे, याचा संदर्भ घेत पाटील बोलत होते.  शरद पवार यांच्याविषयी आदर असल्याचे सांगत, त्यांनी टोला लगावला.विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे कोकणात तातडीने प्रवासाला गेले. पाठोपाठ उद्धव ठाकरे, शरद पवार यांनाही जावे लागले. त्यावर ‘तुम्ही प्रवासाला गेलात तर पडलेली झाडे उभी राहिली असती,’ असे विधान पवार यांनी केले होते. मात्र, पडलेली झाडे उभे राहणे वगैरे प्रकार कधीच होत नसतात, असे पाटील म्हणाले.

याच वेळी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रात सर्कस सुरू असल्याचे टीका केली होती. त्याला उत्तर देताना शरद पवार यांनी आमच्याकडे सर्कस, प्राणी आहे. फक्त विदुषकाची कमतरता आहे, असे म्हटले होते. यावरून पवार यांनी राज्यात सर्कस सुरू असल्याचे मान्य केले आहे, असे चंद्रकातं  पाटील यांनी म्हटले.

माझ्या या विधानानंतर जितेंद्र आव्हाड हे चंद्रकांतदादांना पवारांविषयी आदर नाही, असे विधान करण्यासाठी पुढे येतील. गेली पाच वर्षे मी पवार यांच्या संपर्कात आहे. त्यांच्यासोबत दिल्लीचा प्रवास केला आहे. त्यांचे साखर. शेतीविषयीचे ज्ञान त्याची मला कल्पना आहे. मात्र राजकारणात एखाद्याने एक चेंडू टोलवला की दुसऱ्यालाही तो टोलावणे भाग पडते. पण यातून दीर्घकाळ शत्रुत्व राहत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे राजनाथ सिंह यांनी वक्तव्य केले होते, असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले.