रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी संध्याकाळी लाचलुचपत विभागाची धाड पडली. निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यकाला सव्वा लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले आहे. विनोद लचके असे या स्वीय सहाय्यकाचे नाव आहे.
कर्जत तालुक्यातील वेणगाव येथील जमिन बिन शेती करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाखाली लचके यांनी कृष्णा आंबवणे यांना १ लाख ३० हजारांची लाच मागीतली होती. तडजोडीनंतर १ लाख २५ हजारावर देण्याचे आंबवणे यांनी मान्य केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मंगळवारी संध्याकाळी ही रक्कम देण्याचे ठरले होते.
 या प्रकरणी आंबवणे यांनी रायगडच्या लाचलुचपत विभागात तक्रार केली होती. त्यानुसार रचुन लचके यांना रंगेहाथ पकडले होते. या लाचलुचपत विभागाच्या उप पोलीस अधिक्षक सुनिल कलगुटकर आणि पोलीस निरीक्षक जे बी पाटील यांच्यानेतृत्वाखाली हा सापळा लावण्यात आला होता. गेल्या कित्येक वर्षांत रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर लाचलुचपत विभागाने केलेली सर्वात मोठी कारवाई मानली
जाते .
दरम्यान लचके यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने लाच मागीतली असल्याने या प्रकरणात जिल्हाधिकारी आणि निवासी जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान लाचलुचपत विभागाच्या पथकाने लचके यांच्या घराची तपासणी सुरु केली आहे. लचके यांना अटक करुन बुधवारी अलिबागच्या सत्र न्यायालयात हजर केल जाण्याची शक्यता आहे.