अवकाळी पावासामुळे राज्यात झालेल्या नुकसानीची माहिती देण्यासाठी व केंद्र सरकारने महाराष्ट्राला यासाठी मदत करायली हवी, हे सांगण्यासाठी पंतप्रधान मोदी यांची शरद पवार यांनी भेट घेतली होती. त्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आपण एकत्र काम केल्यास मला आनंद होईल, असे म्हटले होते. मात्र मी त्यांना विनम्रपणे हे शक्य नसल्याचे सांगितले असल्याची माहिती शरद पवार यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान दिली.

याबद्दल अधिक बोलताना पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांना भेटण्यास जाण्यासाठी मी वेळ मागितली होती. नेमकी राज्यातील सत्तास्थापनेच्या घडामोडींदरम्यान वेळ देण्यात आली. कदाचित यामुळे आमच्यात गैरसमज वाढायला मदत होईल, अशी पंतप्रधान कार्यालयाची इच्छा असावी. त्यांनी दिलेल्या वेळेनुसार मी त्यांना भेटायला गेलो होतो. मला काही चिंता नव्हती कारण, मी संपूर्ण विदर्भाचा दौरा करून आलेलो होतो. अवकाळी पावसामुळे संबंध महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीची माहिती देवून, अशा संकटाच्या काळात केंद्र सरकारने मदत करावी, हे त्यांना सांगायचे होते. त्यानुसार यासंदर्भात आमचं बोलणं झालं आणि मी निघालो होतो. मात्र पंतप्रधानांनी मला थांबवलं आणि म्हणाले की, आपण एकत्र येऊन काम केल्यास मला आनंद होईल. यावर मी त्यांना म्हणालो की, आपले व्यक्तीगत संबंध उत्तम आहेत, ते राहतील. परंतु आपण एकत्र काम करणं मला राजकीयदृष्ट्या शक्य नाही.

यावर त्यांनी आपली देशाच्या विकासाबाबतची भूमिका सारखीच असल्याचेही सांगितले. मात्र मी त्यांना असहमती दर्शवत राष्ट्रीय प्रश्नांवर केवळ विरोधक म्हणून विरोधाची भूमिका माझ्याकडून कधीच घेतली जाणार नाही, राष्ट्रीय प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सकारात्मक भूमिका घेतली गेली आहे आणि यापुढे देखील घेतली जाईल, असं म्हणालो. त्यामुळे याबाबत आपण काही चिंता करू नका. मात्र आपण एकत्र काम करावे असा जो तुमचा आग्रह आहे, ते मला शक्य नाही. मी माझ्या पक्षातील लोकांना जी दिशा दिली आहे, त्या बाहेर मी जाऊ इच्छित नाही. त्यामुळे हे मला शक्य नाही, हे त्यांना सांगून मी विनम्रतेने निघालो, असे पवार यांनी यावेळी सांगितले.