सीताराम चांडे

शिर्डीच्या साईबाबा संस्थानने भक्तांसाठी तर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या वस्त्रसंहितेचे लोण आता पोलिसांपर्यंत आले असून पोलिसांच्या खाकी गणवेशाचा रंग एकसारखा असावा म्हणून  एका ठेकेदाराकडून पोशाख खरेदी करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या आदेशामुळे  पोलिसांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचे खाकी कापड व बूट खरेदीपूर्वी निविदा काढून एकत्रितपणे करण्यात येत होती, परंतु आता धुळे येथील एका खासगी पुरवठादाराकडून गणवेशाचे कापड व बूट खरेदी करण्याचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांना दिले आहेत. त्यामुळे गणवेश खरेदी खासगी पुरवठादारांकडून का करायची याबाबत शंका निर्माण झाली आहे.

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गणवेशाचा खाकी रंग एकच असावा त्यामध्ये फरक नसावा, यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना धुळे येथून एका खासगी कापड व्यापाऱ्याकडून गणवेशाचे कापड व इतर साहित्य खरेदी करण्याचे लेखी आदेश काढले आहेत.

विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी त्यांच्या पत्रामध्ये नमूद केले आहे, की त्यांनी भेटी दिलेल्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या गणवेशाच्या खाकी रंगांमध्ये विविधता आढळून येत असल्याचे दिसले. त्यामुळे पोलिस दलाच्या एकरूपतेवर परिणाम होतो, त्यासाठी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना त्यांनी एकाच खाकी रंगाचे कापड व गणवेशाचे साहित्य खरेदी करून त्याचा वापर करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मे. कन्हैया सुटिंग्ज, धुळे यांचेकडून खाकी रंगाचा एकसारखा कपडा खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

पूर्वी कर्मचारी गणवेश व इतर साहित्य खासगीरीत्या खरेदी करत होते. त्यासाठी त्यांना गणवेश भत्ता देण्यात येत होता. गणवेशाचे कापड व इतर साहित्याचे दर कमी आहेत. या ठेकेदाराचे दर तुलनेने जास्त असल्याची चर्चा असून   धुळे येथील पुरवठादारांकडून खरेदीची सक्ती करण्यात आली आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांच्या  गणवेशाचा खाकी रंग वेगवेगळा असल्याने ते संचलन अथवा समारंभात व्यवस्थित दिसत नाही. गणवेशाच्या खाकी रंगामध्ये एकसारखेपणा असावा तसेच पूर्वी गणवेशाची खरेदी एकत्रितपणे व्हायची. आता प्रत्येक जण स्वतंत्रपणे खरेदी करीत असल्याने गणवेशाच्या रंगात भिन्नता दिसून येते. गणवेशाचा खाकी रंग एकच असावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. धुळे येथील ठेकेदाराकडून गणवेशाची खरेदी कशी करायची याची पद्धत आम्ही ठरवून घेऊ. यात  ठेकेदाराला का नेमले हे आपणास माहीत नाही.

– मनोज पाटील, पोलिस अधीक्षक, अहमदनगर</p>