News Flash

…मग फडणवीसांनी ६.३ जीबीचा कोणता पेनड्राइव्ह दाखवला?; काँग्रेसचा सवाल

"...त्यात ते वेळोवेळी तोंडघशी पडले आहेत"

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस. (संग्रहित छायाचित्र । इंडियन एक्स्प्रेस)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांकडून मागील काही दिवसात करण्यात आलेल्या आरोपांवरून काँग्रेसनं पुन्हा एकदा पलटवार केला आहे. भाजपाने रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा आणि फोन टॅपिंग प्रकरणाचा हवाला देत राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. या आरोपांवरून काँग्रेस थेट देवेंद्र फडणवीसांना सवाल केला आहे. त्याचबरोबर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दाखवलेल्या पेनड्राइव्हबद्दलही काँग्रेसनं शंका उपस्थित केली आहे.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाकडून करण्यात आलेल्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिलं. “भाजपाने आतापर्यंत जे आरोप केले, ते निराधार होते. या प्रकरणाशी महाविकास आघाडी सरकारला जोडण्याचा प्रयत्न केला. त्यात ते वेळोवेळी तोंडघशी पडले आहेत. सगळे आरोप खोटे ठरले आहेत. त्यांना याचा सरकारशी कोणताही संबंध जोडता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनापासून जे आरोप देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते करत आहेत. त्यात मुद्दे बदलत आहे. वारंवार ते आरोप बदलत आहेत. पहिला मुद्दा होता अँटेलिया स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या. दुसरा आरोप होता परमबीर सिंह यांचं पत्र आणि तिसरा आरोप केला तो रश्मी शुक्ला यांनी केलेल्या अहवालाचा,” असं सावंत म्हणाले.

“रश्मी शुक्ला यांनी अनधिकृतपणे फोन टॅपिंग केलं होतं. ज्याचा अहवाल त्यांनी ऑगस्ट २०२० मध्ये दिला होता. त्या अहवालाच्या आधारे त्यांनी आरोप केला. या तिन्हींचा एकमेकांशी संबंध नाही. वेगवेगळ्या काळात झालेल्या या गोष्टी आहेत. यात परमबीर सिंह यांची चौकशी होऊ नये. मूळ मुद्दा दुर्लक्षित राहावा, याकरता हे केलं का? परमबीर सिंह यांना कव्हरिंग फायर देण्याचा प्रयत्न झाला का? भाजपाची हीच व्यूहरचना होती का? यांचं उत्तर काही महिन्यात मिळेल. रश्मी शुक्लांनी अनधिकृतपणे फोन टॅपिंग केलेलं. त्यांनी तो अहवाल ऑगस्टमध्ये दिला. त्याला सात महिने होऊन गेले. तो अहवाल दिल्यानंतर अधिवेशनही झाली. या सहा-सात महिन्यात भाजपाला आठवण झाली नाही. देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला जातोय आणि ते उत्तर देत नाहीयेत. फडणवीस यांनी दाखवलेली पेनड्राईव्ह अहवालासोबत देण्यात आली नव्हती. मग फडणवीसांनी ६.३ जीबीची कोणती पेनड्राइव्ह दाखवला? केंद्रीय गृह सचिवांना जाऊन काय दिलं?,” असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 12:17 pm

Web Title: rashmi shukla report phone tapping case congress leader sachin sawant raised question to devendra fadnavis bmh 90
Next Stories
1 …अन् भाजपा आमदाराने वीज कंपनीच्या अभियंत्याला दोरीने बांधलं
2 वरिष्ठाच्या छळाला कंटाळून महिला वनाधिकाऱ्याची आत्महत्या!
3 वायगाव हळदीची इंग्लंडला भुरळ!
Just Now!
X