शाकाहारी जेवण -८० रुपये, मांसाहारी जेवण -१७० रुपये, चहा- १० रुपये, शिरा, उप्पीट, पोहे नाष्टा ३० रुपये आणि २०० मिलीच्या शीतपेय अथवा सरबतासाठी १० ते १५ रुपये. हे एखाद्या खानावळीचे अथवा उपाहारगृहाचे दर नव्हेत तर निवडणुकीत राबणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी केल्या जाणाऱ्या खर्चाचे. निवडणूक आयोगाने स्थानिक पातळीवर या दरांची निश्चिती केली असून त्याप्रमाणे उमेदवाराने दैनंदिन खर्च नमूद करायचा आहे.
उमेदवारांकडून करण्यात येणाऱ्या खर्चासाठी आयोगाच्या निर्देशानुसार सांगलीच्या जिल्हा निवडणूक कार्यालयातून हे दर जाहीर करण्यात आले आहेत. या दराप्रमाणे होणाऱ्या दैनंदिन खर्चाची नोंद करणे प्रत्येक उमेदवाराला बंधनकारक असल्याने कार्यकर्त्यांसाठी होणाऱ्या खर्चाचा आणि प्रत्यक्षात होणाऱ्या खर्चाचा ताळमेळ लावण्यासाठी उमेदवारांना खास व्यक्ती नियुक्त करावी लागत आहे.
याशिवाय निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांच्या खर्चाचे कोष्टक निवडणूक कार्यालयाने जाहीर केले आहे. दुचाकीसाठी दिवसाला ३०० रुपये दर आहे. याशिवाय रिक्षा ६००, जिप, सुमो, क्वालीस या चारचाकी वाहनांसाठी रोजाना १२०० ते १३०० रुपये, इनोव्हा, स्काíपओ यांसारख्या वातानुकूलीत चारचाकीसाठी १६०० रुपये भाडे निर्धारित करण्यात आले आहे. ट्रकसाठी २७००, बससाठी २२०० आणि वातानुकूलित बससाठी ३४०० रुपये दिवसाला भाडे धरण्यात आले आहे. इंधनासह वाहनाकरिता प्रतिकिलोमीटर दुचाकीसाठी ३, रिक्षा ८ आणि चारचाकीसाठी ७ पासून १२ पर्यंत भाडे आहे. तर, ट्रकसाठी २४, १८ आसनी बससाठी २४ व आरामबससाठी २६ रुपये प्रतिकिलोमीटर भाडे निर्धारित करण्यात आले आहे.
याशिवाय ध्वनिक्षेपकाकरिता एक हजार रुपये दिवसाला, कापडी मंडपासाठी दर चौरस फुटाला १ रुपया पत्र्यासह १५ रुपये असे दर आहेत. व्यासपीठावर वापरण्यात येणाऱ्या गादीसाठी ३०, लोडसाठी २० आणि सतरंजीसाठी ४० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. पक्षाच्या वापरण्यात येणाऱ्या झेंडय़ासाठी आकारमानानुसार ५ रुपयापासून ६० रुपयांपर्यंत दर आहेत. टोपीसाठी ४ रुपयांपासून ७ रुपयापर्यंत दर आहे.
कार्यकर्त्यांच्या निवासासाठी साध्या खोलीचा दर १५० रुपये माणसी असून वातानुकूलीत यंत्रणेशिवाय असणाऱ्या खोलीचा दर १२०० प्रतिदिन आणि वातानुकूलीत डिलक्स खोलीचा २१०० रुपये दर आहे.