नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्याची महावितरणला नोटीस

प्रदीप नणंदकर, लातूर</strong>

अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील सारंग सुनील वारद या शेतकऱ्याचा ऊस महावितरणच्या दुर्लक्षामुळे शॉर्टसर्किट झाल्याने जळाला. महावितरणला याबाबतीत वारंवार अर्ज देऊन पाठपुरावा केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याच शेतकऱ्याचा ऊस पुन्हा जळाला. शेतकऱ्याने महावितरणला नुकसान भरपाईची नोटीस बजावली आहे.

अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे सव्‍‌र्हे नंबर २३३ मध्ये सारंग वारद यांनी ऊस लावला होता. २०१५ साली शॉर्टसर्किट झाल्यामुळे त्यांचा उभा ऊस जळाला. त्यानंतर महावितरणकडे त्यांनी तक्रार दिली. विद्युत निरीक्षकांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला व त्या पंचनाम्यात महावितरणच्या सदोष उपकरणामुळे ही घटना घडली. उपकरणाची दुरुस्ती करून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी लेखी कळवले. त्यानंतर १६ नोव्हेंबर २०१८ मध्ये पुन्हा त्याच शेतकऱ्याच्या शेतात शॉर्टसर्किट होऊन दोन एकर उभा ऊस जळाला. पुन्हा संबंधित शेतकऱ्याने महावितरणकडे तक्रार दिली. विद्युत निरीक्षकांनी ९ जानेवारी रोजी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना १६  नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेचा पंचनामा करून आपला अहवाल पाठवला. त्यात महावितरणच्या सदोष उपकरणामुळेच जाळ लागल्याची घटना घडली. ही उपकरणे तातडीने दुरुस्त करायला हवीत असे लेखी कळवले. त्यानंतरही महावितरणला जाग आली नाही. २९  जानेवारी रोजी पुन्हा त्याच शेतकऱ्याचा उभा असलेला आणखीन दोन एकर ऊस शॉर्टसर्किट होऊन जळाला. संबंधित शेतकऱ्याने महावितरणचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, अहमदपूरचे उपअभियंता यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे व थेट आपल्या शेतातील उसाच्या नुकसानीची भरपाई महावितरणने करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

किनगाव येथील महावितरणच्या कार्यालयात लेखी तक्रार दिली तर त्याची पोहोच दिली जात नाही. त्यासाठी अहमदपूर येथे जाऊन तक्रार करा, असे सांगितले जाते. महावितरणचे वीजबिल पूर्ण भरलेले असतानाही शेतकऱ्यांना महावितरणच्या चुकीमुळे होणारे नुकसान सहन करावे लागते आहे, हे अतिशय क्लेशकारक असल्याचे वारद म्हणाले. ग्राहकाने तक्रार नोंदवायची तर कनिष्ठ अभियंत्याचा ई-मेलच उपलब्ध असत नाही त्यामुळे ऑनलाइन तक्रार करायची कुठे, असा प्रश्न वारद यांनी उपस्थित केला. अहमदपूर येथे पूर्णवेळ उपअभियंता नाही त्यामुळेही ग्राहकांच्या अडचणी वाढत असल्याचे ते म्हणाले.