महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झेंडयावर वापरलेल्या राजमुद्रेवर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. मनसेच्या मुंबईत सुरु असलेल्या राजव्यापी अधिवेशनात मनसेच्या नव्या झेंडयाचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. अपेक्षेप्रमाणे झेंडयातील राजमुद्रेवरुन वाद झाला आहे.
काय म्हटले आहे संभाजी ब्रिगेडने?
छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे आहेत. त्यांनी लोककल्याणाकारी स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्य चालवण्यायाठी त्यांनी राजमुद्रेची निर्मिती केली. राजमुद्रा ही प्रशासकीय बाब आहे. महाराजांच्या काळात राजमुद्रा पत्रावर उमटत नव्हती किंवा राजमुद्रेचा शिक्का मारला जात नव्हता तो पर्यंत तो व्यवहार अधिकृत मानला जात नव्हता. इतकी ताकत त्या राजमुद्रेमध्ये आहे असे संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे म्हणाले.
आज मनसेने भगव्या झेंडयावर राजमुद्रा उमटवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा खून केला आहे. हा शिवद्रोह आहे. मतांचा जोगवा मागण्यासाठी जातीचे रंग बाजूला ठेऊन १४ वर्षात राजकीय जहाज बुडाल्यानंतर राज ठाकरेंना छत्रपती शिवाजी महाराजांचा राजमुद्रेचा आधार घ्यावा लागला असे संतोष शिंदे म्हणाले.
भगव्या झेंडयाबद्दल काय म्हणणे आहे?
आमचा भगव्या झेंडयाला विरोध नाही. झेंडयावरील राजमुद्रेला आमचा विरोध आहे. राज ठाकरे आणि मनसे यांच्याविरोधात संभाजी ब्रिगेडने स्वारगेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. राजमुद्रा वापरता येणार नाही असा कायदा असताना राजमुद्रा वापरली जातेय. त्यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संतोष शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन तात्काळ लक्ष घालून कायदेशीर कारवाई करावी. मनसेने झेंडयावरुन राजमुद्रा हटवली नाही तर, संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरुन आपल्या स्टाइलने आंदोलन करेल असा इशारा संतोष शिंदे यांनी दिला.