जुैलचा प्रारंभही पावसाविनाच झाल्याने जिल्ह्यात खरीप पेरण्या रखडल्या आहेत. अनेक लघु-मध्यम प्रकल्प आटल्याने टँकरची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत.
गतवर्षी जोरदार पावसामुळे भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली होती. जिल्ह्यातील बहुतांश लघु-मध्यम प्रकल्प पूर्ण भरले होते. यंदा मृग व आर्दा नक्षत्रांत पाऊस पडेल व पेरणीची कामे जूनमध्येच पूर्ण होतील, या दृष्टीने शेतकऱ्यांनी तयारी केली होती. ही दोन्ही नक्षत्रे कोरडी तर गेलीच, शिवाय जुलस प्रारंभ झाला तरी पावसाने अजूनही डोळे वटारले आहेत. जिल्ह्यास पावसाच्या लहरीपणाचा फटका अनेकदा बसला आहे. साधारणत: २-३ वर्षांनी जिल्ह्यास नसíगक आपत्तीचा सामना करावा लागतो. यंदा ३ नक्षत्रे संपूनही पावसाने दडी मारल्याने बळीराजा हतबल झाला आहे.
जिल्ह्यात जूनच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवडय़ात पेरणीच्या कामाला प्रारंभ होतो. पण अजून कोणत्याही भागात पेरणी सुरूच झाली नाही. पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करीत आहे. काही अंशी ज्या शेतकऱ्यांनी पेरण्याचे धाडस केले, त्यांच्यावर आता दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. जून संपून गेला तरी पावसाने हजेरी न लावल्याने मूग, उडीद यासारखी पिके आता घेता येणार नाहीत. शेतकऱ्यांनी चांगला पाऊस पडेपर्यंत किंवा जमिनीची ओल होईपर्यंत पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाचे प्रकाश पल्लेवाड यांनी केले आहे.
पेरण्यांची कामे थांबली असताना जनतेची तहान भागविण्यासाठी टँकरची संख्याही वाढत चालली आहे. सध्या २२ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. हिमायतनगर, हदगाव आदी तालुक्यांत टँकरची मागणी वाढली. नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयात मात्र ३० एप्रिलपर्यंत पाणीपुरवठा करण्याइतपत साठा आहे.
बीडमध्ये दुबार पेरणीचे संकट
जुलै महिना उजाडला तरी पाऊस न आल्याने जिल्हय़ात पावणेसहा लाख हेक्टर क्षेत्रावरील खरिपाची पेरणी रखडली आहे. दोन महसुली मंडळांत साधारण पावसामुळे शेतकऱ्यांनी आणखी पाऊस पडेल, या आशेवर १३ हजार हेक्टरवर पेरणी केली असली तरी पाऊस न आल्याने या क्षेत्रावरही दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
या वर्षी उडीद, मूग व भुईमुगाचे पीक आता घेता येणार नाही, असे कृषी विभागाचे मत आहे. मागील वर्षी ४४ टक्के पेरणी झाली होती. या वेळी मात्र केवळ दोन टक्केच झाली आहे. जिल्हय़ात खरिपाचे ५ लाख ६५ हजार ७०० हेक्टर क्षेत्र आहे. सर्वसाधारण मध्यम प्रतीच्या जमिनीत उडीद, मूग व भुईमूग पिके मोठय़ा प्रमाणात घेतली जातात, मात्र या पिकांसाठी जूनमध्ये पेरणी होणे आवश्यक असते. यंदा जून महिना संपला, तरी पाऊसच न आल्याने या पिकांचा पेरा झाला नाही. आता ८ जुलैपर्यंत पाऊस झाला नाही, तर ही पिके घेणे योग्य होणार नाही, असे कृषी विभागाचे मत आहे.
मागील वर्षी दुष्काळातून सावरलेल्या शेतकऱ्याला यंदा मात्र गारपिटीने झोडपले व आता खरीप पिकांसाठी आकाशाकडे डोळे लागले असताना पावसाचा अजूनही पत्ता नाही. २६ जूनपर्यंत जिल्हय़ातील ६३ महसुली मंडळांपकी केवळ परळी व घाटनांदूर मंडळांत थोडाफार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी १२ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली. मात्र, पेरणीनंतर थोडाही पाऊस न झाल्याने या क्षेत्रावरही दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. उर्वरित ६१ महसुली मंडळांत अजूनही पेरणी झाली नाही.
मागील वर्षी २७ जूनपर्यंत जिल्हय़ात ४४ टक्के पेरणी झाली होती. या वर्षी मात्र केवळ दोन टक्केच पेरणी झाली आहे. १० जुलैपर्यंत पाऊस पडला तरच पेरणीची आशा आहे. त्यामुळे शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. दुसरीकडे सर्वत्रच पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने शहरांसह गावातही पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे.