विषयाच्या जागी माध्यमाचा उल्लेख केल्याने विद्यार्थी परिक्षेला मुकले
प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठीच्या ‘सेट’ या पात्रता परीक्षेकरिता अर्ज भरताना काही विद्यार्थ्यांनी विषयाच्या जागी चुकून माध्यमाचा उल्लेख केल्याने रविवारी त्यांना थेट परीक्षेलाच मुकावे लागले.
‘स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट’ (सेट) ही प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठीची पात्रता परीक्षा पुणे विद्यापीठातर्फे घेतली जाते. रविवारी या परीक्षेचे आयोजन राज्यभरात करण्यात आले होते. मात्र काही विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयाऐवजी भलत्याच विषयाची प्रश्नपत्रिका दिली गेल्याने त्यांना परीक्षा देता आली नाही. परीक्षेचा विषय म्हणून जो रकाना विद्यार्थ्यांना भरायचा होता त्या ठिकाणी काही जणांनी परीक्षेचे माध्यम म्हणून मराठी किंवा इंग्रजीचा उल्लेख केल्याने हा घोळ झाल्याचा खुलासा सेट परीक्षेच्या आयोजकांतर्फे करण्यात आला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावरदेखील विषय म्हणून संबंधित भाषेचा उल्लेख करण्यात आला आहे.
विद्यार्थी संख्येनुसार परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिकांचे वाटप केले जाते. त्यामुळे असा घोळ झालेल्या विद्यार्थ्यांना रविवारी परीक्षाच देता आली नाही. या कारणामुळे मुंबईत मालाडच्या एका केंद्रावर तब्बल ३० ते ३५ विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले.
याच प्रकारच्या सुमारे ३० तक्रारी मुंबईसह अमरावती व पुण्यातूनही आल्याचे पुणे विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव आणि ‘सेट’ परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी सांभाळणारे आर. एम. राहेरकर यांनी सांगितले. विषयाऐवजी माध्यमाचा उल्लेख केल्याने हा घोळ झालेल्या विद्यार्थ्यांना फक्त इंग्रजी वा मराठी भाषा साहित्याची प्रश्नपत्रिका देण्यात आली.
आम्ही या तक्रारींची माहिती घेऊन या संबंधात सोमवारी बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे राहेरकर यांनी स्पष्ट केले.